Gang rape : पाटणमध्ये मतिमंद अल्पवयीन मुलीवर ८ नराधमांचा बलात्कार | पुढारी

Gang rape : पाटणमध्ये मतिमंद अल्पवयीन मुलीवर ८ नराधमांचा बलात्कार

पाटण ; पुढारी वृत्तसेवा : खाऊ व पैशाचे आमिष दाखवत 8 नराधमांनी अल्पवयीन मतिमंद मुलीवर वेळोवेळी बलात्कार (Gang rape) केल्याची धक्‍कादायक घटना पाटण येथे घडली आहे. विशेष म्हणजे याप्रकरणात एका संशयित महिलेचाही सहभाग असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित महिलेसह 9 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

सर्व संशयितांना सोमवारी सायंकाळी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांसमोर हजर केले असता संशयित महिलेस 24 फेबु्रवारीपर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्याचवेळी अत्याचार करणार्‍या अन्य 8 संशयितांना 2 मार्चपर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

याबाबत पाटण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाटण येथील एका महिलेने 27 जानेवारी ते 18 फेब्रुवारी 2022 या कालावधीत तिच्या परिचयाच्या एका अल्पवयीन मतिमंद मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन तिला बाहेर फिरायला नेण्याचे, बाहेर गेल्यानंतर खाऊ खायला देण्यासह पैसे देण्याचे अमिष दाखवले. आमिष दाखवल्यानंतर बाहेर आलेल्या त्या दुर्दैवी मतिमंद मुलीची पाटणसह आसपासच्या भागातील लोकांशी ओळख करून देत तिला त्यांच्याशी शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचे पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणात सहभागी आठ संशयितांनी संबंधित मुलीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन वारंवार तिच्यावर बलात्कार (Gang rape) केला आहे. या धक्कादायक प्रकाराची माहिती संबंधित मुलीच्या आईसह नातेवाईकांना समजल्यानंतर त्यांनी पाटण पोलिस ठाण्यात धाव घेतली. याबाबत यातील पिडीत अल्पवयीन मतिमंद मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पाटण पोलिस ठाण्यात 32/2022 भा. द. वि. स. कलम 366 अ, 376 (2) (एल), (जे), (एन), 376 (3), 376 (डी. ए.), 370 (4),34 लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 6, 17 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचा प्राथमिक तपास पाटण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांनी केला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस अधीक्षक सातारा यांच्या आदेशाने या गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस अधिकारी करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे पाटण शहरासह संपूर्ण तालुका हादरला आहे. या घडलेल्या घृणास्पद घटनेमुळे पाटण परिसरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

बारा तासांत आवळल्या संशयितांच्या मुसक्या

या गुन्ह्यातील संशयित महिलेसह 9 आरोपींची नावे निष्पन्‍न करून त्यांचा शोध घेऊन त्यांना अवघ्या बारा तासांतच ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. संशयितांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर या प्रकरणात आणखी काही संशयितांचा सहभाग आहे का? याचा तपास सुरू आहे. तसेच संशयितांकडील चौकशीवेळी समोर आलेल्या सर्व माहितीची सत्यता पडताळण्याची कार्यवाही सुरू असल्याचे पाटण पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Back to top button