बिबट्या अन् मानव संघर्ष वाढणार | पुढारी

बिबट्या अन् मानव संघर्ष वाढणार

ढेबेवाडी ः विठ्ठल चव्हाण

अडीच महिन्यापूर्वी येणके येथे ऊस तोडणी मजुराच्या चिमुकल्याचा बिबट्याने बळी घेतल्यानंतर अशाच प्रकारचा हल्ला किरपे गावात करून बिबट्याने आपली दहशत कायम ठेवली आहे. केवळ वडिलांच्या धाडसामुळेच मुलाचा जीव वाचला आहे. त्यामुळेच आता बिबट्या व मानव यांच्यातील संघर्ष वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळेच माणसाचे प्राण महत्त्वाचे की वन्य प्राण्यांचे ? याबाबत प्राधान्यक्रम ठरवून वनविभागाने कायद्याचा फेरआढावा घेत त्याबाबत पुनर्रचना करणे गरजेचे आहे.

किरपे (ता. कराड) येथे बुधवारी 20 जानेवारीला शेतकरी धनंजय देवकर हे आपला लहान मुलगा राज याच्यासह त्यांच्या परिटकी परिसरातील शिवारात त्यांच्या शेतातील पावटा पिकाच्या शेंगा तोडायला गेले होते. काम उरकून सायंकाळी सहाच्या सुमारास ते घरी निघण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी बिबट्याने राज देवकर याच्यावर हल्ला केला.

समोरच ही अचानक ही घटना घडल्याने धनंजय देवकर यांनी प्रसंगावधान राखत अतिशय धैर्याने राजचे पाय पकडून त्याला बिबट्याच्या तोंडातून सोडविण्यासाठी ओढून आरडाओरडाही केला. त्यानंतरही बिबट्या मुलाला ओढत नेण्याचा प्रयत्न करीत होता. या ओढाताणीत बिबट्या शेताला घातलेल्या तारेच्या कुंपणाला धडकला व शेताबाहेर जाण्यात अडथळा आला व त्याची गती मंदावली धनंजय यांच्या त्या ओरडण्याच्या आवाजाने शेजारच्या शेतालगत असलेल्या ग्रामस्थांनी तिकडे धाव घेतली. त्यानंतर बिबट्याने राज देवकरला सोडून तेथून धूम ठोकली.

किरपेचे पोलीस पाटील प्रविणकुमार तिकवडे यांनी स्वतःच्या गाडीतून राजला उपचारासाठी तातडीने कराडच्या कृष्णा रुग्णालयात हलविले. रात्री उशिरा सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे, वनक्षेत्रपाल तुषार नवले, वनपाल व वनरक्षक यांनी कृष्णा हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी मुलाची व वडिलांची भेट घेऊन चौकशी केली. तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांना या घटनेची माहिती कळविल्याचे सांगितले. सर्व अधिकार्‍यांनी किरपे गावालांही भेट दिली आणि घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच रात्री 11 वाजता सरपंच प्रज्ञा देवकर, उपसरपंच विजय देवकर, पोलीस पाटील प्रविण कुमार तिकवडे व गावातील प्रमुख ग्रामस्थांसोबत ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेतली. तेव्हा या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, बिबट्या पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

याबाबत आम्ही दक्षता घेत आहोतच, पण ग्रामस्थांनीही सावधगिरी बाळगत सहकार्य करावे व काळजी घ्यावी, असे आवाहन सहाय्यक वन संरक्षक झांजुर्णे यांनी केले. मागील दोन दशकांपासून येणके, किरपे परिसरात बिबट्यांचा वावर आहे. येणके येथे सुमारे 13 ते 14 वर्षापूर्वी एका बिबट्याचा ग्रामस्थांनी बळी घेतला होता. या बिबट्याने गावातील काही ग्रामस्थांवर हल्लाही केला होता. तसेच वनविभागाने ग्रामस्थांवरच गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मागील तीन महिन्यात दोनदा बिबट्याने मुलांवर हल्ले केले आहेत.

बिबट्याने शेेळी, जनावरे यांच्यावर हल्ले केले होते आणि शेतकर्‍यांना नुकसान भरपाईही मिळाली आहे.मात्र आता मुलांवर हल्ले होऊ लागल्याने संपूर्ण परिसर दहशतीखाली आहे. माणसाकडे जसा विचार आहे तसा संतापही आहे. त्याच्याकडे सहनशीलताही आहे ; पण त्यालाही काही मर्यादाही आहेत. सहनशीलतेचा कधीतरी अंत होतो. तो जर शासकीय नियमामुळे झाला; त्याची जबाबदारीही शासनाचीच असायला हवी, असे मत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

पिंजर्‍याची परवानगी जिल्हा पातळीवरच हवी…

बिबट्याकडून दोन मुलांवर हल्ले झाल्याने परिसरातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. मात्र पिंजरा लावण्यासाठी नागपूर, दिल्ली यासारख्या ठिकाणी परवानगी मागावी लागते. त्यामुळे पिंजरा लावण्याचे अधिकार जिल्हा पातळीवर देण्यात यावेत. स्थानिक परिस्थिती नागपूर, दिल्लीतील वरिष्ठांना माहिती नसते आणि त्यामुळेच अनेकदा पिंजरा लावण्यासाठी विलंब होतो.

हेही वाचलं का?

Back to top button