मुंबई; पुढारी ऑनलाईन
ग्लोबल टीचर अॅवार्ड विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी सरकारी नोकरीत होणाऱ्या त्रासामुळं तीव्र नाराजी व्यक्त केलीय. त्यांनी अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जाण्यासाठी शिक्षण अधिकार्यांकडे अर्ज केला होता. पण प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी आधी शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवायला हवं ना! असा प्रश्न उपस्थित केला होता. यामुळे वाद निर्माण झाला होता. यावर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी, रणजितसिंह डिसले यांचा अर्ज मंजूर करण्यास सांगितले आहे. याबाबत त्यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.
"सोलापूरच्या परितेवाडी जि. प. शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी उच्च शिक्षणासंदर्भात दिलेल्या अर्जाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिलीप स्वामी यांच्याशी चर्चा करून हा अर्ज मंजूर करण्यास सांगितले आहे." असे वर्षा गायकवाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
यावर डिसले यांनी ट्विट करत शिक्षणमंत्री गायकवाड यांचे आभार मानले आहेत. "माननीय शिक्षणमंत्री @VarshaEGaikwad यांनी घेतलेल्या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो. या निर्णयामुळे फुलब्राइट स्कॉलरशिपची संधी हुकणार नाही, याचा आनंद आहे. यानिमित्ताने मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो." असे डिसले यांनी म्हटले आहे.
माढा तालुक्यातील परितेवाडी शाळेचे शिक्षक डिसले गुरूजींना अमेरिकेची स्कॉलरशिप मिळाली. त्यांना ग्लोबर टीचर पुरस्कारही मिळाला. जागतिक बँकेवर त्यांची निवडही झाली. पण, त्या गुरुजींच्या कामावर आता चक्क शिक्षणाधिकाऱ्यांनीच प्रश्न उपस्थित केला आहे. मागील तीन वर्षांपासून डिसले शाळेत गेलेले नाहीत. तीन वर्षांत त्यांनी नेमकं काय केलं? असा प्रश्न उपस्थित करत याबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे आला आहे. तीन वर्षे डिसले गुरुजी शाळेकडे फिरकलेलेच नाहीत, असे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी सांगत डिसले यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत दिले होते. यावरुन वाद झाला होता.
कोरोनामुळे दोन वर्षांपासून सर्व शाळा बंद होत्या आणि आता सुद्धा शाळा बंद आहेत. या काळात डिसले गुरूजी यांनी वेगवेगळ्या मार्गांनी विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम केले आहे. या कोरोनाच्या काळात डिसले गुरूजींनी शिक्षकांनी गुणवत्ता कशी वाढवावी, ऑनलाईन शिक्षणाशिवाय दुसरे पर्याय शोधून काढत शिक्षणाचा नवा पॅटर्न समोर आणला होता.
परदेशात दिल्या जाणाऱ्या शिक्षणावरही त्यांनी अभ्यास केला आहे. यामुळेच त्यांची वर्ल्ड बँकेच्या शिक्षण सल्लागारपदी निवड झाली. त्यानंतर त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. जेव्हा त्यांना अमेरिकेची स्कॉलरशिप जाहीर झाली, तेव्हा त्यांनी आपल्या रजेचा अर्ज शिक्षण अधिकाऱ्यांकडे दिला होता. साधारण दीड महिन्यांपूर्वी त्यांनी रजेसाठी अर्ज दिला होता. पण त्यांच्या अर्जात त्रुटी असल्याचे कारण पुढे करत त्यांची रजा मंजूर करण्यात आली नव्हती.
शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश लेखी स्वरूपात मिळाल्यानंतर आपली भूमिका मांडणार आहे. अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी होत आहे. त्यामुळे मानसिक त्रास होतोय. यातून काम करण्याची इच्छा मारली जात आहे. याचा अधिक त्रास राज्यपाल यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर झाला, अशी भावना रणजितसिंह डिसले यांनी व्यक्त केली होती.