सोलापूर : अडीच एकर द्राक्षबाग जमीनदोस्त, नगरपंचायत निवडणुकीतील रागातून केले कृत्य | पुढारी

सोलापूर : अडीच एकर द्राक्षबाग जमीनदोस्त, नगरपंचायत निवडणुकीतील रागातून केले कृत्य

वैराग : पुढारी वृत्तसेवा

वैराग नगरपंचायत निवडणुकीत दुखावलेल्या अज्ञातांनी ढोराळे (ता. बार्शी) येथील ईस्माइल पटेल यांच्या अडीच एकर द्राक्ष बागेचे नुकसान केले आहे. द्राक्ष बागेचे सुमारे पंधरा ते वीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. हे नुकसान राजकीय सुडबुद्धीने केल्याची तक्रार शेतकरी इस्माईल पटेल यांनी वैराग पोलिस ठाण्यांत दिली.

ईस्माईल पटेल यांच्या शेतातील द्राक्षाचे पीक हे विक्रीसाठी तयार होते, अज्ञातांनी द्राक्ष घड तोडून टाकले असून झाडेही कापण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सर्व स्तरांतून या राजकीय सूडबुद्धीचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. अधिक माहिती अशी, मौलाना आझाद विचार मंचचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष ईस्माईल पटेल हे राहण्यास वैरागमध्ये असले तरी त्यांची नऊ एकर शेतजमीन ढोराळे येथे आहे. त्यामध्ये त्यांनी अडीच एकर द्राक्ष बाग लावलेली आहे. दरम्यान, नुकत्याच वैराग नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक नऊ आणि बारामधून इस्माईल पटेल यांचा पुतण्या इलियास याकूब पटेल हा उमेदवार म्हणून चर्चेत होता.परंतु काही राजकीय हालचालीनंतर पटेल कुटुंबीय निवडणुकीपासून लांब राहिले.

त्यानंतर 19 जानेवारी रोजी या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्याच्या दुसर्‍या दिवशी 20 रोजी मध्यरात्री ढोराळे येथील द्राक्ष बागेत अज्ञात इसमांनी विक्रीसाठी तयार होत असलेलीे हजारो द्राक्ष घड तोडून टाकले. यात अनेक झाडे बुडातूनच कापली, तर काही झाडे तोडून टाकली. अडीच एकर क्षेत्रांतील सुमारे अकराशे झाडांवरील द्राक्ष घड तोडून टाकण्यात आलेले आहेत. तर वीसहून अधिक झाडे बुडासहित कापलेली आहेत. ठिबक सिंचन पाईप, मोटार आदी साहित्यही चोरीला गेले आहे. यात पटेल यांचे सुमारे 15 ते 20 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे ईस्माईल पटेल यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारी अर्जात नमूद केले आहे. निवडणुकीतील आकसापोटी सूडबुद्धीने हे कृत्य केल्याचा आरोप त्यांनी केला असून त्याचा छडा लावावा अशी विनंतीही त्यांनी पोलिसांनी केली आहे. दरम्यान या घटनेनंतर वैराग भागातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले असून विविध स्तरांतून या कृत्याचा निषेध होत आहे.

वैराग भागात याचीच चर्चा

वैराग नगरपंचायत झाल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक लागली आहे. त्यामुळे वैरागमध्ये निवडणुकीची जोरदार तयारी झाली होती. इस्माईल पटेल यांचा पुतण्या इलियास याकूब प्रभाग 9 व 13 मधून उमेदवार म्हणून चर्चेत होता. राजकीय हालचालीनंतर त्यांचे कुटुंब निवडणुकीपासून दूर राहिले. निकालाच्या दुसर्‍याच दिवशी काही अज्ञातांनी राजकीय सुडबुद्धीने अडीच एकर द्राक्षबाग जमीनदोस्त केल्याने सुमारे 15 लाखांचे नुकसान झाले. याचीच चर्चा वैराग भागात सुरू होती.

Back to top button