‘यूपी’त शिवसेनेची भिस्त शेतकरी संघटनांवर | पुढारी

‘यूपी’त शिवसेनेची भिस्त शेतकरी संघटनांवर

नवी दिल्ली ः सुमेध बनसोड

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यात शिवसेनेने 14 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. राम जन्मभूमी आंदोलनात पक्षाचे मोेठे योगदान असून भाजपसोबत काडीमोड झाल्यानंतर ‘यूपी’त शेतकरी संघटनांच्या सहकार्याने पक्ष नशीब आजमावत आहे. शिवसेनेने किसान रक्षा पार्टीसोबत युती केली आहे.

प्रत्येक मतदार संघातील शेतकरी नेत्यांना विश्‍वासात घेऊन शिवसेना ‘ग्राऊंड लेवल’ वर काम करत असल्याची माहिती आहे. शेतकर्‍यांच्या मनात केंद्रातील मोदी सरकारविरोधात असलेल्या रोषाला शिवसेनेच्या बाजूने मतांमध्ये परिवर्तित करण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जात असल्याचे दिसते.

राष्ट्रीय राजधानीलगतच्या नोएडा विधानसभा मतदारसंघातून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे पुत्र भाजप आमदार पंकज सिंह यांचे निकटवर्तीय राजकुमार आगरवाल शिवसेनेच्या तिकिटावर लढणार आहेत. मेरठ छावणी मतदारसंघातून शेतकरी नेते राकेश टिकेत यांचे निकटवर्तीय दीपक सिरोहा यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. साहिबाबादेतून शेतकरी आंदोलनातील सक्रिय नेत्या रेखा शर्मा, अलीगढमधून शेतकरी नेते केशव देव, अनुपशहरमधून रश्मी गोल्डी, मांड विधानसभा मतदारसंघातून धनगर समाजाचे नेते अ‍ॅड. राजकुमार धनगर यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. 14 उमेदवारांनी आतापर्यंत अर्ज दाखल केला आहे.

पहिल्या टप्यातील अर्ज दाखल करण्याची शुक्रवारी शेवटची तारीख होती. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशातील बाहुबली नेते दोनवेळा आमदार राहिलेले भगवान शर्मा ऊर्फ गुड्डू पंडित यांनी डिवाई मतदारसंघातून अर्ज दाखल केला. राज्यातील अनेक मतदार संघांवर त्यांचा प्रभाव आहे. 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्यात मतदार होणार आहे. संयुक्‍त किसान मोर्चाचे केंद्रीय सदस्य संदीप गिड्डे यांच्यावर शिवसेनेने निवडणुकीची जबाबदारी टाकली आहे. बुंदेलखंड मधील 19 मतदारसंघात किसान रक्षा पार्टीचे उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत, अशी माहिती संदीप गिड्डे यांनी दिली.

Back to top button