सांगली : कृषी संशोधन केंद्र उरले नावापुरतेच | पुढारी

सांगली : कृषी संशोधन केंद्र उरले नावापुरतेच

सांगली, पुढारी वृत्तसेवा: मिरज तालुक्यातील कसबेडिग्रज येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संलग्न कृषी संशोधन केंद्र आहे. या केंद्राचा जिल्ह्यातील शेतीला आणि शेतकर्‍यांना आजपर्यंत किती फायदा झाला, हा प्रश्न अनुत्तरित आहे. बदलत्या काळानुसार या केंद्राने शेतीसाठी नवे संशोधन, प्रयोग आणि शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

पूर्वी कधीतरी झालेले कृषी संशोधन आणि काही चर्चासत्रातील सहभाग वगळता अलीकडच्या काळात तरी हे कृषी संशोधन केंद्र अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांच्या मदतीला धावून गेल्याचे दिसत नाही.

तत्कालीन सांगली संस्थानातील कसबे डिग्रज हे शेतीनिष्ठ गाव. या लौकिकामुळेच 1948 मध्ये येथे कृषी विद्यालय सुरू करण्यात आले होते. सन 1972 मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कृषी संशोधन केंद्र या विद्यालयात सुरू झाले. मिरज तालुक्याच्या पश्चिम भागासह जिल्ह्यातील शेतकर्‍यांना या केंद्राकडून मदत मिळावी, अशी अपेक्षा होती.

हळद, खाऊची पाने यांचेही सुधारित वाण विकसित केले. तसेच सोयाबीनवरील तांबेरा रोगाच्या निवारणासाठी संशोधन केले. क्षारपड जमीन सुधारणेसाठी निचरा पद्धत सुचवली, असाही केंद्रातील संशोधक आणि प्राध्यापकांचा दावा आहे. मात्र हे संशोधन किंवा सुधारित वाण प्रत्यक्ष शेतापर्यंत किती पोहोचले, त्यामुळे उत्पादनात किती वाढ झाली, याची ठोस माहिती मिळत नाही.

या केंद्राने आतापर्यंत सोयाबीनचे फुले कल्याणी, फुले दुर्वा, फुले अग्रणी, फुले संगम, फुले किमया, तसेच भुईमुगाचे फुले वारणा, फुले मोरणा, फुले चैतन्य असे सुधारित वाण शोधून काढले किंवा विकसित केले, असा केंद्राचा दावा आहे.

गेल्या काही वर्षांत ज्वारी, भुईमूग यांचे उत्पादन घटले आहे. सोयाबीनचे पीकही कमी उत्पादन आणि रोगराईमुळे शेतकर्‍यांना परवडत नाही. क्षारपड जमिनीचा प्रश्न ‘जैसे थे आहे. उलट क्षारपडीचा कॅन्सर वाढतोच आहे. द्राक्षांवर करपा, भुरी, डाऊनी दरवर्षी हल्ले करीत आहेत.

हे रोग आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी महागडी कीटकनाशके पदरमोड करून वापरत आहेत. पूर्व भागात डाळिंबावर तेल्या रोगाचे आक्रमण अजूनही सुरूच आहे. शेतकर्‍यांच्या या समस्या सोडवण्यासाठी या संशोधन केंद्राचे योगदान किती, असा प्रश्न जाणकार विचारत आहेत.

केंद्रातील अनेक पदे रिक्त

गेल्या अनेक महिन्यांपासून या केंद्रातील अनेक पदे रिक्त
आहे. रिक्त पदे पुढीलप्रमाणे ः सहयोगी प्राध्यापक 1, सहायक प्राध्यापक 1, कनिष्ठ संशोधन सहायक 1, वरिष्ठ क्लार्क 1, कनिष्ठ क्लार्क 2, ड्रायव्हर 1, लॅब अटेंडंट 1, मुकादम1, शिपाई 1, चौकीदार 1, मजूर 7, बैलवाला 1, एकूण 20 पदे रिक्त. रिक्तपदे भरण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची मागणी शेतकर्‍यांतून होत आहे.

केंद्राकडे शंभर एकर जमीन

संशोधन केंद्राकडे कसबेडिग्रज, मौजे डिग्रज आणि तुंग या परिसरामध्ये 100 एकर जमीन आहे. त्यामधील काही जमीन लागवडीखाली आहे. काही क्षेत्रामध्ये संशोधन, मत्स्य तळी असल्याचे केंद्रातर्फे सांगण्यात आले. पण प्रत्यक्षात खरेच या सर्व सुपीक अशा पिकाऊ जमिनीमध्ये संशोधन होते का आणि ते होत असेल तर या संशोधनाचा शेतकर्‍यांना उपयोग झाला का, याची उत्तरे शोधली पाहिजेत.

हेही वाचलंत का? 

केंद्राचा शेतकर्‍यांना फायदाच

कृषी संशोधन केंद्रामार्फत आजपर्यंत सोयाबीन आणि भुईमुगाच्या काही जाती विकसित केल्या आहेत. क्षारपड जमिनीच्या सुधारणेबाबत ही केंद्राने काम केले आहे. शेतीची उन्नती होण्यासाठी केंद्रामध्ये आजही संशोधन सुरू आहे. प्रामुख्याने सोयाबीन, भुईमुगातून जास्त उत्पन्न देणार्‍या सुधारित वाण शोधून काढण्यासाठी संशोधन सुरू आहे. तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव कमी राहील, असे काही वाण विकसित केले आहेत, तसेच अजून याबाबत संशोधन सुरू आहे. या केंद्राचा शेतकर्‍यांना भरपूर फायदा झाला आहे.
-मिलिंद देशमुख, प्रभारी कृषी अधिकारी, कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज

Back to top button