सांगली महापालिकेच्या सभा, बैठका पुन्हा ऑनलाईन | पुढारी

सांगली महापालिकेच्या सभा, बैठका पुन्हा ऑनलाईन

सांगली, पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील सर्व महापालिकांच्या महासभा, स्थायी समिती व इतर सर्व वैधानिक समित्यांच्या सर्व बंधनकारक बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे /ऑनलाईन पद्धतीनेच घ्याव्यात, असा आदेश शासनाच्या नगरविकास विभागाने काढला आहे. राज्यात महानगरांमध्ये ओमाक्रॉनमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने हा आदेश जारी केला आहे.

राज्यातील नागरी स्थानिक संस्थांच्या सभा प्रत्यक्ष उपस्थितीने घेण्याबाबत दि. 22 ऑक्टोबर रोजी नगरविकास विभागाने आदेश जारी केलेले आहे. मात्र मुंबई महापालिका क्षेत्र तसेच राज्यातील इतर भागात विशेषतः महानगरात देखील ओमायक्रॉनमुळे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्याची गंभीर दखल घेत मोठ्या प्रमाणावरील एकत्रिकरण टाळण्याच्या दृष्टीने राज्यातील महानगरपालिकांच्या सर्व बंधनकारक सभा, बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे / ऑनलाईन पध्दतीनेच घेण्यात याव्यात, असा आदेश नगरविकास विभागाच्या अवर सचिवांना काढला आहे.

‘कोरोना’ संसर्ग रोखण्यासाठी अनेक उपाययोजनांचा एक भाग म्हणून मोठ्या प्रमाणावर व्यक्तींच्या एकत्र येण्यावर निर्बंध घातले होते. सभा, बैठकांवरही निर्बंध घातले होते. दीड वर्षे विषय समितींच्या सभा, महासभा ऑनलाईन झाल्या. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा ऑफलाईन सुरू असताना महापालिकेचीच महासभा ऑनलाईन का, असा प्रश्नही उपस्थित केला जात होता.

राज्यातील महापौरांनीही नगरविकासमंत्री यांना लेखी निवेदन देऊन महासभांचे कामकाज पूर्ववत ऑफलाईनने घेण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी केली होती. त्याचा परिणाम म्हणून दि. 22ऑक्टोबर रोजी नगरविकास विभागाने आदेश काढून प्रत्यक्ष उपस्थितीने सभा, बैठका घेण्यास सहमती देण्याचा आदेश जारी केला.

सांगली महापालिकेच्या प्रभाग 16 अ च्या पोटनिवडणूक आचारसंहितेने महासभा होऊ शकली नाही. तेवढ्यात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता निर्माण झाली आहे.

ओमायक्रॉनचा संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे शासनाने महापालिकांच्या सभा, बैठका पुन्हा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे / ऑनलाईन घेण्याचे आदेश काढले आहेत. त्या पुन्हा ऑनलाईन सभा, बैठकांचा सिलसिला सुरू होईल.

हेही वाचलंत का? 

Back to top button