विश्वजीत कदम, “ग्रामीण भागातील विद्यार्थी क्रीडा क्षेत्राला गतवैभव मिळवून देतील” | पुढारी

विश्वजीत कदम, "ग्रामीण भागातील विद्यार्थी क्रीडा क्षेत्राला गतवैभव मिळवून देतील"

जत, पुढारी वृत्तसेवा : जत येथे राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करून ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन व प्रेरणा दिली जात आहे. निश्चितच ग्रामीण भागातील खेळाडू क्रीडा क्षेत्राला गतवैभव मिळवून देतील. राज्य क्रॉस कंट्री स्पर्धेचे आयोजन जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन व विक्रम फाउंडेशनने अतिशय देखणे उत्कृष्ट केले आहे याचा अभिमान आहे. तसेच तालुक्यातील क्रीडाक्षेत्रात लागेल ती मदत खेळाडू मार्गदर्शक संघटक यांची मदत भारती विद्यापीठाच्या वतीने दिली जाईल, असे प्रतिपादन  कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी केले.

जत येथे राजे रामराव महाविद्यालयाच्या प्रांगणात सांगली जिल्हा ॲथलेटिक्स व विक्रम फाउंडेशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळा प्रसंगी ते बोलत होते. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत नऊशे स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. राज्य क्रॉस कंट्री स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याने वर्चस्व मिळवले.

यावेळी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, स्वामी विवेकानंद संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, शार्दुलराजे डफळे ,पोलीस उप अधीक्षक रत्नाकर नवले, प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे, जिल्हा बँकेचे संचालक सरदार पाटील, नगरसेवक राजू यादव, नगरसेवक भूपेंद्र कांबळे, रिपाईचे जिल्हाध्यक्ष संजयराव कांबळे, प्राचार्य एम. एस. पाटील, मार्केट कमिटीचे संचालक अभिजित चव्हाण, जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे, असाेसिएशनचे संजय पाटील व गौतम पाटील आदी उपस्थित होते.

आमदार सावंत म्हणाले, जतचे रणजी क्रिकेट स्पर्धेचे कर्णधार स्व. विजयसिंह डफळे सरकार यांच्या जतच्या क्रीडा क्षेत्रातील वारसा व परंपरा जपण्यासाठी तसेच तालुक्यातील विशेषता ग्रामीण भागातून राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक संघटक घडावेत, यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंच्या सुप्तगुणांना वाव मिळतो, असेही सावंत म्हणाले.

जत तालुक्यातील विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेकडे वाढता कल

आमदार सावंत यांनी जत येथे राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धा आयोजित करून क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंना प्रेरणा देण्याचे काम केले आहे.तसेच  कृष्णप्रकाश अकॅडमी येळवी येथे जिल्हास्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये तालुक्यातील स्पर्धकांनी चांगले यश मिळवले होते .नुकतेच ओंकार स्वरूपा शैक्षणिक संस्थेच्या वतीने येळवी येथे तालुकास्तरीय व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, थाळीफेक, गोळाफेक, रस्सी-खेच, धावणे स्पर्धेचे आयोजन केले होते.

हेही वाचलं का? 

Back to top button