Lok Sabha Election 2024 : सांगलीत मविआत उभी फूट; संजय राऊतांच्या दौर्‍याकडे काँग्रेस, राष्ट्रवादीची पाठ | पुढारी

Lok Sabha Election 2024 : सांगलीत मविआत उभी फूट; संजय राऊतांच्या दौर्‍याकडे काँग्रेस, राष्ट्रवादीची पाठ

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगलीच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत उभी फूट पडल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या दौर्‍याकडे काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी गटाने पाठ फिरवली. या दोन्ही पक्षांचा कोणीही नेता अथवा पदाधिकारी राऊत यांच्या दौर्‍यावेळी फिरकला नाही. राऊत यांनी येथे पत्रकार परिषदही घेतली. दोन्ही काँग्रेसने पाठ फिरवल्यामुळेच ‘आला तर तुमच्याबरोबर, नाही तर तुमच्याशिवाय’ असे बोलण्याची वेळ राऊत यांच्यावर आली.

मुंबई आणि पुण्यातील पथके घेऊन राऊत सांगलीत आलेले आहेत. तसे त्यांनीच जाहीर केलेले आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा तिढा सुटलेला नाही. शिवसेना ठाकरे गट व काँग्रेस नेते दोन्ही पक्ष सांगलीची जागा लढविण्यासाठी ठाम आहेत. त्याचवेळी खासदार राऊत तीन दिवसांच्या सांगली जिल्हा दौर्‍यावर आले आहेत ‘कोल्हापूरच्या बदल्यात सांगली’ हा निर्णय कधी आणि केव्हा झाला, असा प्रश्न त्यांना विचारला. या प्रश्नावर ते शेवटपर्यंत काहीही बोलले नाहीत. राज्यातील कोणाही नेत्याचे नाव त्यांनी घेतले नाही. या चर्चेत काँग्रेस नेते सतेज पाटील, आमदार विश्वजित कदम यावेळी चर्चेत नव्हते, असे त्यांना सांगावे लागले. त्यांनी दिल्लीस्थित पक्षश्रेष्ठींची नावे घेतली; मात्र राज्यातील कोणते पाच नेते उपस्थित होते, ते सांगितले नाही.

विशाल पाटील, विश्वजित कदम हे महत्त्वाचे राजकीय नेते आहेत. ते शिवसेनेला मदत करतील, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. चंद्रहार पाटील हा शिवसेनेचा उमेदवार नाही, तर तो महाविकास आघाडीचा आहे, असे त्यांनी सांगितले. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांनी राष्ट्रीय पातळीवरील विचार करावा. सांगलीच्या जागेसाठी अडून बसणे म्हणजे हिंदकेसरीने गल्लीतील कुस्ती खेळण्यासारखे आहे, अशी टीका त्यांनी केली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात देशभर रोष आहे. ते 400 पारचा नारा देत आहेत; मात्र तो फसवा आहे. मोदी पंतप्रधान होणार नाहीत. त्यांचा पक्षही सत्तेवर येणार नाही. जनतेचीही हीच इच्छा आहे.

विशाल यांना संसदेत पाठवू

राऊत म्हणाले, विशाल पाटील यांच्यासंदर्भात आम्हाला आस्था आहे. सांगली तसेच काँग्रेसचे राज्यातील नेतृत्व कार्यकर्त्यांची समजूत काढतील. विशाल पाटील संसदेत कसे जातील, याची काळजी घेऊ. त्यासाठी शिवसेना पुढाकार घेईल. सांगलीच्याबाबतीत काँग्रेसशी अनेक पर्यायांची चर्चा केली आहे. बंद खोलीतील ही चर्चा तुम्हाला सांगणार नाही.

महाराष्ट्र ठरेल गेम चेंजर

 खासदार राऊत म्हणाले, देशातील महाराष्ट्र, पश्चिम बंगाल दिल्ली, बिहार ही निवडणुकीच्या द़ृष्टीने महत्त्वाची राज्ये आहेत. महाराष्ट्रात 48 जागा आहेत. त्यापैकी 35 जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील. या निवडणुकीत महाराष्ट्र गेम चेंजर ठरेल.

काँग्रेसचा एकही नाही, शिवसेनेचे 18 खासदार

आमदार विश्वजित कदम यांनी शिवसेनेची जिल्ह्यात ताकद नाही, त्यांच्याकडे एकही ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, सहकारी संस्था नाही, अशी टीका केली आहे. यासंदर्भात राऊत म्हणाले, काँग्रेसकडे एकही खासदार नाही. शिवसेनेकडे कायम 18 च्या वर खासदार राहिले आहेत. लोकसभेच्या निवडणुका राष्ट्रीय प्रश्नावर लढविल्या जातात, सध्याही तसेच होते आहे.

Back to top button