IPL Betting : मिरजेत आयपीएल सट्टा जोमात, यंत्रणा कोमात | पुढारी

IPL Betting : मिरजेत आयपीएल सट्टा जोमात, यंत्रणा कोमात

स्वप्निल पाटील

मिरज : आयपीएल क्रिकेट सामन्यांवर मिरजेत जोरदार सट्टा सुरू आहे. यावर्षी चेन्नई सुपर किंग्ज विजेते पदासाठी सट्टा बाजारात फेव्हरेट आहे. बेटिंग अ‍ॅप आणि हॉटलाइनवरून प्रत्येक सामन्यावर लाखो रुपयांचे बेटिंग लावण्यात येत आहे. बेळगाव जिल्ह्यातील क्रिकेट बेटिंगचे देखील नियंत्रण मिरजेतून करण्यात येत आहे.

प्रत्येकवर्षी आयपीएल क्रिकेट सामन्यावर लाखो रुपयांचा सट्टा लावला जातो. कोण जिंकणार, यावर सर्वाधिक सट्टा लावला जातो. गेल्यावर्षी मुंबई इंडियन्स सट्टा बाजारात फेव्हरेट होती. यावर्षी मात्र चेन्नई सुपर किंग्ज ही विजेतेपदासाठी सट्टा बाजारात फेव्हरेट आहे. प्रत्येक सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला सर्वात कमी म्हणजे रुपयाला एक रुपया दर दिला जात आहे. त्यापाठोपाठ मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांना बेटिंग लावले जात आहे. मिरजेत घेतले जाणारे बेटिंग हे स्वतंत्र अ‍ॅपवरून घेतले जात आहे. यासाठी मिरजेतील बेटिंग बुकींनी स्वतंत्र अ‍ॅप तयार केले असून त्यासाठी एजंट देखील नेमले आहेत.

मिरजेतील बुकींनी नेमलेल्या एजंटाकडे अ‍ॅपवरून बेटिंग लावण्यासाठी पैसे रोख भरावे लागतात. त्यानंतर त्यांना आयडी व पासवर्ड दिला जातो. ग्राहकाच्या नावाने आलेल्या या आयडीवरून प्रत्येक सामन्यात कोणता संघ जिंकणार, किती धावा काढणार, कोणता फलंदाज किती धावा काढणार, कोणता गोलंदाज किती बळी घेणार, महत्त्वाच्या आणि अटीतटीच्या सामन्यात किती षटकार होणार, यावर मिरजेत जोमात बेटिंग सुरू आहे.

मिरजेत घेतला जाणारा सट्टा बेटिंग अ‍ॅपवरून सुरू आहेच. शिवाय हॉटलाईनवरून देखील थेट बुकिंग घेण्याची सोय देखील बकींनी केली आहे. मिरजेतील सादिक, समीर, रमजान, अमित आणि नजीर या बेटिंग बुकींनी आयपीएल बेटिंग अ‍ॅप सुरू केले आहे. सांगली, मिरजेसह कर्नाटक सीमाभागातील चिक्कोडी, गोकाक, बेळगाव या परिसरातील आयपीएल बेटिंगवरही मिरजेतील बेटिंग बुकींचे नियंत्रण आहे.
आयपीएल सीझन सुरू झाल्यानंतर सट्टा बाजारात मोठ्या उलाढाली होत असतात. मिरजेतील बेटिंग बुकी देखील यामध्ये सक्रिय असतात. त्यामुळे आयपीएल सीझनमध्ये सट्टा बाजारात लाखो रुपयांची उलाढाल प्रत्येक सामन्यामध्ये होत असते. गेल्यावर्षी गोकाक पोलिसांनी मिरजेत एका बुकी अड्ड्यावर छापा टाकत कारवाई केली होती. यावर्षी सुरू झालेल्या सट्टा बाजाराकडे मात्र पोलिसांचे सोयीस्कर दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.

सट्टा बाजार पोलिस मोडीत काढणार?

ड्रग्जमुळे सांगली राज्यामध्ये प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे सांगली पोलिस काय करतात, असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. प्रत्येकवर्षी आयपीएलमध्ये मिरजेत सट्टा बाजार जोमात चालतो. यावर्षी देखील आयपीएलचा हंगाम सुरू झाल्यामुळे बेटिंग अ‍ॅपद्वारे सट्टा सुरू झाला आहे. आयपीएल हंगाम सुमारे दीड महिना चालणार आहे. प्रत्येकवर्षी आयपीएलमधून बुकी कोट्यवधी रुपयांची माया जमवत असतात. परंतु यावर्षी तरी पोलिस आयपीएल सट्टा बाजार मोडीत काढणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Back to top button