Sangli Maratha Andolan: विटा येथे मराठा कार्यकर्त्यांच्या आक्रमक आंदोलनामुळे तणाव | पुढारी

Sangli Maratha Andolan: विटा येथे मराठा कार्यकर्त्यांच्या आक्रमक आंदोलनामुळे तणाव

विटा : पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण मागणीसाठी बेमुदत उपोषण आंदोलनाला बसलेल्या मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी विटा येथे सकल मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आज (दि.३०) प्रचंड आक्रमक झाले. शेकडो कार्यकर्त्यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील महसूल भवनासमोर आंदोलन सुरू केले. तर काही आंदोलकांनी भवनच्या चार मजली इमारतीवरून उडी टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला. दरम्यान तहसीलदार उदयसिंह गायकवाड यांनी मध्यस्थी करून पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याशी आंदोलकांचा संपर्क साधून दिला आणि वातावरण निवळले. Sangli Maratha Andolan

राज्यकर्त्यांचे आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी शंकर मोहिते, विकास जाधव, जगन्नाथ पाटील यांच्यासह आंदोलकांनी अचानक प्रशासकीय इमारतीच्या चौथ्या मजल्यावर धाव घेत तेथून उड्या मारण्याचा इशारा दिला. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली. तहसिलदार उदयसिंह गायकवाड, प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल यांनी प्रशासकीय इमारतीवर जावून आंदोलकांची भेट घेतली. त्यानंतर पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याशी संपर्क झाल्यानंतर संतप्त आंदोलक इमारतीवरून खाली उतरले. Sangli Maratha Andolan

यावेळी आरक्षण आणि मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सरकार आणि जरांगे-पाटील यांच्यात तोडगा निघत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आंदोलक आक्रमक झाले.

सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर बसलेल्या लोकप्रतिनिधींनी आपले सांगलीतील आंदोलन मागे घ्यावे. त्यांनी मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमोर बसून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मागणी करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. याबाबत पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याशी बोलणे करून देण्याची मागणी आंदोलकांनी केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

हेही वाचा 

Back to top button