सांगली : बागेवाडीत मेंढपाळावर लांडग्याचा हल्ला; ३२ मेंढ्या ठार तर २२ बेपत्ता | पुढारी

सांगली : बागेवाडीत मेंढपाळावर लांडग्याचा हल्ला; ३२ मेंढ्या ठार तर २२ बेपत्ता

जत; पुढारी वृत्तसेवा : बागेवाडी (ता.जत) येथे एका मेंढ्याच्या कळपावर लांडग्यांनी हल्ला करत 32 मेंढ्या ठार केल्या. तर या हल्ल्यात 22 मेंढ्या गायब झाल्या आहेत. ही घटना कुंभारी व बागेवाडी दरम्यान असणाऱ्या सरकारी दवाखान्याजवळ नानासाहेब पडळकर यांच्या शेतात घडली आहे. लांडग्याने कळपावर हल्ला मंगळवारी पहाटे केला आहे. या हल्ल्यात मेषपालकाचे मोठे नुकसान झाले आहे. मोठा हल्ला होण्याची जत तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे.याबाबत मेषपालक बिरू विठू जोंग यांनी वनविभागाला माहिती दिली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बिरू विठू जोंग हे राशिवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील रहिवासी असून मेंढ्यांचा भटकंती करत त्यांच्या मेंढरांचा कळप जत तालुक्यातील बागेवाडी येथील नानासाहेब पळवंत पडळकर यांच्या मालकीच्या गट नंबर २५६ शेतात बसवला होता.दरम्यान मंगळवार (दि.२६) रोजी पहाटे लांडग्याच्या काळपाने पहाटे एक ते तीन दोनच्या दरम्यान हल्ला केला. या  हल्ल्यात ३२ मेंढ्या ठार झाल्या आहेत. आठ गंभीर जखमी तर २२ मेंढ्या बेपत्ता आहेत. लांडग्याच्या हल्ल्यात कळप पूर्णपणे विखुरला होता.मेंढ्या जवळपास दोन ते तीन किलोमीटर परिसरात हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या होत्या. रिमझिम तुरळक पावसात मेषपालक विठू जोंग यांच्यावर हल्ला करण्यात आला. यात सुमारे सात लाखाचे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनास्थळी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे, जिल्हाध्यक्ष राहुल चौगुले ,राम कोळेकर, अनिल बंडगर यांनी भेट दिली. वनक्षेत्रपाल प्रवीण पाटील यांना माहिती दिली त्यानंतर मयत झालेल्या मेंढ्यांचा पंचनामा करण्यात आला आहे.

काही वेळा वन्य प्राण्यांचा कळप मारलेल्या प्राण्यांना पूर्णपणे खाऊन टाकतो पूर्णपणे खाल्ल्यानंतर त्या प्राण्याचे अवशेष मिळत नाहीत पंचनामासाठी वन कर्मचारी यांना व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना मृत प्राणी आवश्यक असतो परंतु वन्यप्राण्याने पूर्ण खाऊन टाकल्याने सदर प्राण्याचे अवशेष मिळत नसल्याने अशा प्राण्याची नोंद पंचनामे व नुकसान भरपाईसाठी घेतली जात नसल्याने नुकसान भरपाई मिळत नसल्याने मेंढपाळ व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.तरी शासनाने याची नोंद घ्यावी.
– संजय वाघमोडे, यशवंत क्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष

बागेवाडी येथे मेंढ्याच्या कळपावर झालेल्या लांडग्याच्या हल्ल्यात मेषपालक विठ्ठल जोग यांच्या ३२ मेंढ्या ठार झाले आहेत तर २२ मेंढ्या बेपत्ता आहे. तरी आसपास व परिसरातील शेतकऱ्यांनी ज्यांना गायब झालेल्या मेंढ्या मिळतील. त्यांनी संबंधित मेषपालक व वन विभागाशी संपर्क साधावा. ठार झालेल्या सर्व मेंढ्यांचा पंचनामा केलेला आहे. मदतीसाठी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठवण्यात येणार आहे.
– प्रवीण पाटील, वनक्षेत्रपाल वनविभाग जत

Back to top button