सांगली : जादा परताव्याच्या बहाण्याने दोन कोटी 11 लाखांचा गंडा | पुढारी

सांगली : जादा परताव्याच्या बहाण्याने दोन कोटी 11 लाखांचा गंडा

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  शेअर मार्केटमध्ये पैशाची गुंतवणूक करून जादा परतावा देण्याच्या आमिषाने दोघांना 2 कोटी 11 लाखांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी राजेंद्र शिवाजी शिंदे यांनी पुण्यातील पाच जणांवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुणाल शंतनू सावंत, अनिरुद्ध अनिल सावंत (दोघे रा. किराडवाड, नानापेठ, पुणे), हर्षल अशोक साळुंखे, सेल्वी हर्षल साळुंखे, ललिता हर्षल साळुंखे (रा. लक्ष्मीनारायण मंदिर मंगळवार पेठ, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

राजेंद्र यांना संशयितांनी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून पाच टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले. तसेच गुंतविलेल्या रकमेच्या सुरक्षिततेसाठी जमीनही नावावर करण्याचे आश्वासन दिले. शिंदे व त्याच्या मित्राने संशयितांकडे काही रक्कम गुंतविली. सुरुवातीला संशयितांनी फिर्यादीच्या मित्राला 12 लाखांचा परतावा देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्याकडून 2 कोटी 11 लाख
60 हजार रुपये घेतले. त्यानंतर संशयितांनी पाच टक्के परतावा व जमीनही नावावर करून न देता फसवणूक केली.

या प्रकरणी शिंदे यांनी विश्रामबाग पोलिसांत तक्रार अर्ज दिला. तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक अमितकुमार पाटील यांनी तक्रार अर्जाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यासाठी परवानगी मिळण्याबाबत उपाधीक्षकांकडे अहवाल सादर केला होता. त्यानुसार पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button