सांगली : पत्नीचा खून केल्याबद्दल जन्मठेप | पुढारी

सांगली : पत्नीचा खून केल्याबद्दल जन्मठेप

सांगली, पुढारी वृत्तसेवा : किरकोळ कारणावरून पत्नीचा खून केल्याबद्दल मारुती रामचंद्र कोळपे (रा. डोर्ली, ता. जत) याला जन्मठेप व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश आर. के. मलाबादे यांनी सुनावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील मकरंद एच. ग्रामोपाध्ये यांनी काम पाहिले. दंड न भरल्यास 1 महिना ज्यादा सक्तमजुरीची शिक्षा भोगण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

खटल्याची पार्श्वभूमी अशी : मारुती कोळपे पत्नी मनीषा हिच्याबरोबर 100 फुटी रोड, मुळीक प्लॉट, संजयनगर सांगली येथे भाडोत्री खोलीमध्ये राहत होता. दि. 22 फेब्रुवारी 2017 रोजी रात्री मनीषाने मारुतीला सांगितले की ‘मला नागीन झाली आहे, त्याचा त्रास मला होत आहे’. त्यावेळी मारुतीने तिला शिवीगाळ करीत घरातील स्टोव्ह मधील रॉकेल काढून अंगावर टाकले व तिला पेटवून दिले.

या घटनेमध्ये जखमी झालेली त्याची पत्नी आरडाओरडा करू लागली. तिचा आरडाओरडा ऐकून मारुती तेथून पळून गेला. तिचा आवाज ऐकून घर मालक व शेजारचे लोक घटनास्थळी आले व जखमी अवस्थेत तिला सांगली येथील शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केले.

त्या दिवशीच पहाटे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मृत्युपूर्वी तिने पोलिसांमध्ये जबाब दिला होता. तोच जबाब फिर्याद म्हणून वापरण्यात आली. याप्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्यामध्ये मारुती कोळपे याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. तत्कालीन पोलिस निरीक्षक पी. डी. जाधव यांनी तपास करून मारुती विरुद्ध आरोप पत्र दाखल केले.

सरकार पक्षातर्फे या खटल्यामध्ये एकूण 8 साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने फिर्यादीचा जबाब, घटनास्थळाचा पंचनामा व अन्य साक्षी पुरावे ग्राह्य धरून मारुती कोळपे याला भा.द.वि. कलम 302 अन्वये दोषी ठरवून शिक्षा सुनावली. सरकार पक्षाला संजयनगर पोलिस ठाण्याचे हवालदार बाबासाहेब काटकर, पैरवी कक्षातील अशोक तुराई, वंदना मिसाळ यांनी मदत केली.

Back to top button