भाजपच्या माध्यमातून पुन्हा जोमाने कामाला लागा : अमरसिंह देशमुख | पुढारी

भाजपच्या माध्यमातून पुन्हा जोमाने कामाला लागा : अमरसिंह देशमुख

आटपाडी, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा मध्यवर्ती बँक,बाजार समिती आणि कारखाना निवडणुकीत काही चुका झाल्या,राजकीय खेळ्या झाल्या. परंतु, झालेल्या चुका मान्य करून त्या विसरून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पुन्हा जोमाने कामाने लागण्याचे आणि गतवैभव प्राप्त करण्याचे आवाहन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी केले. भाजप देशमुख गटाच्या कार्यकर्त्याच्या बैठकीत त्यांनी पक्ष बदलाच्या शक्यता आणि अफवांना देखील पूर्णविराम दिला.

आटपाडी येथील भाजपच्या देशमुख गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक आज पार पडली. माजी आमदार राजेंद्र  देशमुख, अमरसिंह देशमुख, हरिभाऊ माने, चंद्रकांत भोसले, विद्या देशपांडे, सुमन नागणे, हर्षवर्धन देशमुख, भाऊसाहेब गायकवाड, दादासाहेब मरगळे, बळवंतराव मोरे, सावंता पुसावळे, महिपत पवार, विठ्ठल पुकळे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमरसिंह देशमुख म्हणाले, निवडणुकांत भरपूर राजकारण झाले.जिल्हा बँक आणि बाजार समितीत आमदार अनिल बाबर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना मदत केली. कारखाना निवडणुकीपूर्वी त्यांना भेटून विधानसभेला सहकार्य केल्याचे सांगत यावेळी मदत करण्याचे आवाहन केले. पण त्यांच्या कार्यकर्त्याने ऐकले नाही आणि सांगोल्याच्या देशमुखांनी पण फसवले. पक्षामार्फत मदत मिळाली नाही.पण आता विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्षपद देत नवी संधी दिली आहे.

ते म्हणाले भाजपमध्ये गेलो. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत यश मिळविले.विधानसभेला पक्षाचा आदेश प्रमाण मानून काम केले. गेल्या काही निवडणुकीत काही निर्णय चुकले. संपर्क कमी पडला. निकालाने आपल्याला जागृत केले आहे.

राजेंद्र देशमुख म्हणाले, पराभवाच्या मालिकेनंतरही मोठ्या संख्येने आलेले कार्यकर्तेच आमची ताकद आहे. झालेल्या चुका दुरुस्त करु आणि संपर्क वाढवून जोमाने काम करु. बाबासाहेब देशमुख यांच्या काळातही एकदा असे घडले होते. या आगामी निवडणुकीत आपली ताकद दाखवून देण्यासाठी सज्ज व्हा.  कारखाना सुरू करण्यासाठी खूप प्रयत्न केले. ऊस नसताना कारखाना चालवला, क्षमता वाढवली पण अपेक्षित मदत न मिळाल्याने कारखाना बंद पडला. संस्था वाचविण्याच्या प्रयत्नांत संपर्क कमी झाला आणि राजकीय खेळीने पराभव झाला.

कार्यकर्त्यांनी अमरसिंह देशमुख यांनी अंतिम निर्णय घ्यावेत या सुचनेबद्दल त्यांनी माझी हरकत नसल्याचे स्पष्ट केले.यावेळी अमरसिंह यांनी देखील आम्ही एकत्रित बसून निर्णय घेण्याची ग्वाही देत दोघांमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे अप्रत्यक्षपणे दाखवून दिले.

बैठकीत कार्यकर्त्यांनी विरोधक त्यांच्या कार्यकर्त्यांच्या चुकीच्या गोष्टींना देखील पाठींबा देतात.कायम संपर्क ठेवतात.भाजप आपल्याला आवश्यक ती मदत देत नाहीत. उमेदवार निवडताना झालेल्या चुकांवर बोट ठेवले.काहींनी आपल्या गटात दडपशाही नाही तर लोकशाही विचाराने काम केले जाते ही पद्धतच कायम ठेवावी अशी मागणी केली.बैठकीत विचारमंथन कार्यकर्ते रिचार्ज झाले.

हेही वाचलंत का?

Back to top button