राजेंद्र कवडे देशमुख
बावडा(पुणे) : जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या पादुकांना परंपरेनुसार सराटी (ता. इंदापूर) येथे नदी पात्रात नीरा स्नान घालण्याचा विधी उत्साही व भक्तीमय वातावरणात शनिवारी (दि. २४) सकाळी पार पडला. त्यानंतर पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातून सकाळी ८ वाजता नीरा नदी ओलांडून सोलापूर जिल्ह्यात दाखल झाला. नीरा नदीकाठी वसलेल्या सराटी गावी पालखी सोहळ्याचा शुक्रवारी (दि. २३) रात्रीचा मुक्काम होता.
त्यानंतर सकाळी पादुकांना देहू संस्थानचे विश्वस्त व सोहळाप्रमुख तसेच ग्रामस्थांनी फुले अंथरलेल्या रस्त्यावरून वाजतगाजत नीरा नदी पात्रात नेऊन पादुका स्नानाचा विधी हा मंत्रोपचारात हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत झाला. पादुकांना स्नान घातल्यानंतर चंदनाची उटी लावून मंत्रोपच्चारात फुले व पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर पादुकांना नागरिकांच्या दर्शनासाठी पालखीतळावरील पालखीमध्ये ठेवण्यात आले.
शेकडो वर्षापूर्वी निरा नदीवर पूल नसताना सराटी येथील कोळी बांधव हे पालखीस होडीमध्ये घेऊन नदी पार करण्यास मदत करीत. त्याची उतराई म्हणून पादुका स्नान विधीनंतर पालखीतळावर सोहळा प्रमुखांच्या हस्ते कोळी बांधवांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांच्यासह शासकीय अधिकाऱ्यांचा सोहळा पार पाडण्यास सहकार्य केल्याबद्दल देखील सत्कार करण्यात आला.
त्यानंतर ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेऊन रथामध्ये ठेवली. यावेळी इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे, उपसरपंच संतोष कोकाटे, अमीन तांबोळी, बापू कोकाटे, राजेंद्र कुरळे, मनोज जगदाळे, लालासाहेब काटे, अमर जगदाळे, आण्णा कोकाटे, काकासाहेब जगदाळे, ज्ञानदेव कोकाटे, रोहित जगदाळे, सुधीर कोकाटे, अमर भोसले, चंद्रकांत कोकाटे, बाबासाहेब कोकाटे आदी उपस्थित होते.
पोलिस अधीक्षक अंकित गोयल, बारामतीचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांचेसह महसूल, पोलिस, ग्रामविकास, आरोग्य आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी सराटी ग्रामस्थ व शासकीय अधिकाऱ्यांनी नीरा नदी पार करून सोहळ्यास सोलापूर जिल्हा हद्दीपर्यंत निरोप दिला. याप्रसंगी पुणे ग्रामीण पोलिस दलाने पालखीच्या सुरक्षेचा ताबा सोलापूर ग्रामीण पोलिसांकडे सुपूर्द केला. सोलापूर हद्दीत जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व मान्यवरांनी पालखीचे स्वागत केले. त्यानंतर पालखी सोहळा अकलूजकडे रवाना झाला.
नीरा नदीचे पात्र सध्या पाण्याअभावी कोरडे पडल्याने पादुकांना नीरा स्नान घालण्यासाठी नदीपात्रात टँकरने पाणी आणावे लागले. नीरा नदीच्या वरील बाजूस असलेल्या अनेक बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा उपलब्ध असल्याने या बंधाऱ्यांमधील पाणी निरा स्नानासाठी वेळेवर नदीच्या पात्रात सोडण्याचे नियोजन अधिकाऱ्यांनी केले नसल्याचा आरोप यावेळी राजेंद्र कुरळे व ग्रामस्थांनी केला.
हेही वाचा