कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या बहुतांशी भागात शनिवारी मान्सूनधारा बरसल्या. दिवसभर पावसाने थांबून थांबून हजेरी लावली. धरण क्षेत्रातही चांगला पाऊस सुरू झाला आहे. पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
संपूण जुनच कोरडा जातो की काय, अशी परिस्थिती असताना अखेर शुक्रवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी मान्सून दाखल झाला. शनिवारी पहाटेपासून शहर आणि परिसरात दमदार पाऊस झाला. दिवसभर पावसाची रिपरीप सुरू होती. शहरासह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली.
जिल्ह्याचा सर्वच धरण क्षेत्रात गेल्या २४ तासात चांगल्या पावसाची नोंद झाली. कुंभी, घटप्रभा आणि जांबरे प्रकल्पात दमदार पाऊस झाला. कासारी परिसरात ५१ मि.मी.,कोदे परिसरात ३६ मि.मी., पाटगांव परिसरात २८ मि.मी. पाऊस झाला. अन्य धरण परिसरातही चांगल्या पावसाची नोंद झाली.