सांगली बसचे आता महिला करणार सारथ्य! | पुढारी

सांगली बसचे आता महिला करणार सारथ्य!

सांगली; अंजर अथणीकर :  एसटीची वाहतूक ही अवजड वाहतूक समजली जाते. त्यामुळे यामध्ये आजपर्यंत पुरुष चालकांची मक्तेदारी होती, ती आता मोडीत निघत असून, बसचे सारथ्य आता महिला चालक करणार आहेत. येत्या पंधरवड्यात सांगली आगारामध्ये अकरा महिला बस चालक म्हणून रुजू होत असून, लालपरीचे स्टेरिंग आता त्यांच्या हातात येणार आहे.

एसटीचे चालक होण्यासाठी खडतर आणि कडक प्रशिक्षणातून जावे लागते. 50 ते 60 प्रवाशांचा जीव त्यांच्या हातात असतो. त्यात एसटी ही अवजड वाहतूक असल्यामुळ गेल्या 75 वर्षात एसटीचे चालक हे पुरुष राहिले आहेत. महिला आता सर्वच क्षेत्रात पुरुषांच्याबरोबरीने काम करीत आहेत. यामुळे एसटी महामंडळाने महिला चालकानाही संधी देण्याचा निर्णय घेतला. अर्थात राज्यात काही ठिकाणी एसटीचे चालक म्हणून महिला कार्य करू लागल्या आहेत.

सांगली जिल्ह्यातील विविध आगारामध्ये काम करण्यासाठी अकरा महिलांनी बस चालकाचे प्रशिक्षण घेतले आहे. अगोदर एक वर्षाचे, त्यानंतर 80 दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. यातील सहा महिलांनी तीन हजार कि. मी. बस चालवण्याचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. उर्वरीत महिलांचे येत्या पंधरा दिवसात प्रशिक्षण पूर्ण होणार आहे. येत्या पंधरवड्या या महिला प्रत्यक्षात सेवेत दाखल होणार आहेत. सुरुवातीला त्यांना कमी पल्ल्याची बस चालवण्यास देण्यात येणार आहे.

एसटी सुरू झाल्यानंतर 75 वर्षानंतर महिला चालकांचे पथक सांगली महामंडळात रुजू होत आहे. सांगली जिल्ह्यात रुजू होणार्‍या महिला चालकांना रोज दोन तास बस चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यांची वैद्यकीय तपासणीही पूर्ण झाली आहे. बसमध्ये अधिकारी वर्ग त्यांच्या सारथ्यावर लक्ष देत आहेत.

या होणार महिला बस चालक

स्वप्नाली शंकर सुवरे, कविता मुकन पवार, सुवर्णा अशोक बनसोडे, शारदा महानंद मदने, रसीमा खलील तडवी, सीमा सचिन लोहार, स्मिता प्रल्हाद मधाळे, अंजुम मैनुद्दीन पिरजादे, मीनाताई भीमराव व्हनमाने, ज्योती सुकलाल ठोसरे, सरोज महिपती हांडे.

सांगली जिल्ह्यात आता लवकरच महिला बस चालक सेवा देणार आहेत. त्यांचे प्रशिक्षण पूर्ण होत आहेत. एसटीच्या 75 वर्षाच्या सेवा काळात पहिल्यादांच महिला चालक रुजू होत आहेत.
– सरनील भोकरे, एसटी विभाग नियंत्रक, सांगली

Back to top button