खरिपासाठी निकृष्ट बियाणे, खते बाजारात, जादा दराने विक्री; कारवाईसाठी अकरा भरारी पथके सज्ज | पुढारी

खरिपासाठी निकृष्ट बियाणे, खते बाजारात, जादा दराने विक्री; कारवाईसाठी अकरा भरारी पथके सज्ज

सांगली; शशिकांत शिंदे : शेतकर्‍यांची खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. मात्र या पार्श्वभूमीवर काही दुकानात निकृष्ट बियाणे, खते आली आहेत. अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांच्या माथी मारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काहीजण जादा किमतीने बियाणे विक्री करीत आहेत.

दरम्यान, शेतकर्‍यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके वेळेत व योग्य दरामध्ये उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. निकृष्ट बियाणे, खते विक्री रोखण्यासाठी 11 भरारी पथके तयार केली आहेत. यात 33 जणांचा समावेश आहे. या पथकाकडून कृषी दुकानांची अचानक तपासणी करण्यात येणार आहे. यातील दोषींवर कारवाई होणार आहे.

जून जवळ येऊ लागल्याने शेतकर्‍यांची तयारी सुरू झाली आहे. खरिपाच्या पार्श्वभूमीवर कृषी दुकानात खते, बियाणे मागवण्यात आली आहेत. काही दुकानदारांकडे निकृष्ट बियाणे व खते विक्रीसाठी आहेत. तर काही दुकानदार जादा किंमतीने सर्रास विक्री करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने तयारी केली आहे. शेतकर्‍यांना चांगल्या प्रतीचे बियाणे उपलब्ध करुन देण्याबरोरबच उत्पादन वाढीसाठी त्याला मार्गदर्शन करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. दुबार पेरणीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन बियाणे, खते व कीटकनाशकांची विक्री करावी, अशा सूचना दिल्या आहेत.

कमी दर्जाच्या निविष्ठा, रासायनिक खते व कीटकनाशकामुळे फसवणूक होऊ नये यासाठी बियाणे, खते, कीटकनाशके या वर्गवारीनुसार जिल्हास्तरावर 11 भरारी पथके जिल्ह्यात कार्यरत केली आहेत. त्यांच्यामार्फत बियाणे विक्रेत्यांची अचानक तपासणी केली जाणार आहे. बोगस बियाणे जादा दराने विक्री केल्यास संबंधित विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. यामुळे शेतकर्‍यांची फसवणूक होणार नाही व अनधिकृतरित्या विक्री होणार्‍या बोगस बियाणे व खते विक्रीला लगाम घालण्यास मदत होणार आहे.

तक्रार निवारण कक्षाची स्थापना

निकृष्ट दर्जाचे बियाणे, खते विक्री संदर्भात तक्रार करण्यासाठी जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात आलेली आहे. जिल्हास्तरावर जिल्हा कृषी अधीक्षक व तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार करता येणार आहे.

निकृष्ट माल शेतकर्‍यांच्या माथी

अनेक शेतकर्‍यांचे खरीप मशागतीसाठी पैसे खर्च होत आहेत. बियाणे, खते खरेदीसाठी पैसे उपलब्ध नसतात. त्यामुळे कृषी दुकानातून उधार बियाणे, खते घेतात. त्यातून कमी दर्जाचा माल शेतकर्‍यांच्या माथी मारण्याचे प्रकार होतात. बियाणे न उगवल्यास दुबार पेरणीचा धोका आहे.

देशीवाण संपण्याच्या मार्गावर

अधिक उत्पादन मिळण्यासाठी संकरीत बियाणे वापरण्याकडे शेतकर्‍यांचा कल वाढत आहे. त्यामुळे पारंपरिक वापरले जाणारे देशी वाण आता संपण्याच्या मार्गावर आहेत. मात्र, संकरीत बियाणे हे प्रत्येक वर्षी खरेदी करावे लागते. त्यासाठी जादा पैसे मोजावे लागतात.

सेंद्रिय खताच्या नावाखाली फसवणूक

गेल्या काही वर्षापासून सेंद्रिय शेतमाल खरेदीकडे लोकांचा कल वाढत आहे. शेणखताला मागणी जास्त असल्याने त्याचे दर भडकले आहेत. त्यामुळे सेंद्रिय खतांचा वापर वाढत आहे. मात्र सेंद्रिय खताच्या नावाखाली अनेक कंपन्याकडून शेतकर्‍यांची फसवणूक होत आहे.

निकृष्ट दर्जाचे बियाणे किंवा खतासंदर्भात काही तक्रार असल्यास संबंधितांनी आमच्या तक्रार निवारण केंद्राशी संपर्क साधावा. संबंधितावर कारवाई करण्यात येईल.
– विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

Back to top button