‘करणी’मुळे दरवर्षी 20 जणांची हत्या | पुढारी

‘करणी’मुळे दरवर्षी 20 जणांची हत्या

सांगली; गणेश मानस :  बाबाचा दरबार … त्याचे भक्त समोर बसलेले… ते विचारतात… बाबा, माझा काका नुकताच वारला. काय झालं असेल त्याला… बाबांनी डोळे मिटले… अचानक बाबा ओरडले… करणी बेटा, करणी… तुझ्या नात्यातल्याच त्या बाईने करणी केली बघ… समोर बसलेल्या भक्ताचे डोळे रागाने लाल झाले. त्याने बाबाला विचारले… कोण आहे ती… तसेच बाबा भक्ताला म्हणाला, इकडे ये, कानात सांगतो. तसा बाबाने करणी केलेल्या व्यक्तीचे नाव कानात सांगितले. तसा भक्त तडख उठला.. मित्रांना एकत्र करून सरळ त्या बाईचे घर गाठले… घरात ती बाई व तिची मुलगी होती. कशाचाही विचार न करता त्या दोन्ही मायलेकीला मारहाण करण्यास सुरुवात केली. दोघींच्याही नरड्यावर पाय देऊन त्यांचा जीव गेल्यानंतरच तो पाय बाजूला काढला.
अंधश्रद्धेची जारणमारण, करणी-भानामतीची जीवघेणी अघोरी परंपरा 21 व्या शतकातही महाराष्ट्रात तितकीच जोरदार सुरू आहे. आपल्यावर कोणीतरी करणी केलेली आहे, या संशयातून दरवर्षी महाराष्ट्रात तब्बल सरासरी 20 जणांची हत्त्या होते. यात काही केसेसमध्ये करणीचा उल्लेख असतो, तर काहीमध्ये नसतो. विदर्भ, मराठवाड्यात तर करणीने धुमाकूळ घातला आहे. करणी करून देण्यामध्ये कोकणातली करणी फेमस आहे. करणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील एक ठिकाणही प्रसिद्धीस येत आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातही बुवाबाजीचे प्रस्थ वाढत आहे. करणीच्या भीतीने प्राध्यापक, अभियंतेही बळी पडत असल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत.
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात कोणीकोनूर येथे करणी-भानामतीच्या संशयातून प्रियांका बिराप्पा बेळुंखी व तिची मुलगी मोहिनी बेळुंखे या मायलेकीचा त्यांच्याच भावकीतील तरुणांनी गळा आवळून खून केल्याची घटना 22 एप्रिल 2023 रोजी रात्री घडली. गेल्यावर्षी म्हैसाळमध्ये अब्बास बागवान या मांत्रिकाने शेतातील गुप्तधन काढून देतो, असे सांगून अज्ञात शक्तीला आवाहन करण्याचे नाटक केले. वनमोरे कुटुंबाकडून लाखो रुपये उकळले. त्यानंतर कुटुंबातील नऊ जणांना विषारी द्रव देऊन हत्त्या केली.

दौंड तालुक्यात तीन चिमुरड्यांसह सात जणांची हत्या

या वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारीमध्ये पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीत भीमा नदीपात्रात मोहन उत्तम पवार, संगीता ऊर्फ शहाबाई मोहन पवार, श्याम फुलवरे, राणी श्याम फुलवरे, रितेश श्याम फुलवरे, छोटू फुलवरे, कृष्णा श्याम फुलवरे या एकाच कुटुंबातील सातजणांचे मृतदेह आढळले. सुरुवातीला सामूहिक आत्महत्या वाटणार्‍या या घटनेला पोलिस तपासात करणीच्या संशयातून मोहन पवार याच्या चुलत भावानेच सात जणांची हत्त्या केल्याचे उघड झाले.
वर्धा जिल्ह्यातील सोनगाव येथील गजानन आडे याचा शेतात मृतदेह आढळला होता. पत्नी व मुलावर करणी केल्याच्या संशयातून गावातीलच देविदास कुमरे याने गजानन याला काठीने मारून खून केल्याचे समोर आले. गेल्याच महिन्यात नांदेड बिलोली तालुक्यातील गागलेगाव येथे मुलीवर करणी केल्याच्या संशयातून 85 वर्षीय हणमंत काशिराम पांचाळ या गावातीलच वामण डुमणे व अन्य दोघांनी मारहाण करून खून केल्याचे समोर आले.
बीड जिल्ह्यातील घटना म्हशीवर करणी केल्याच्या संशयातून शुभम ऊर्फ राज सपकाळ या सहा वर्षांच्या बालकाचा गळा आवळून खून करून त्याचा मृतदेह पोत्यात घालून शाळेसमोर टाकला होता. याप्रकरणी भावकीतीलच एका दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली.
नाशिक जिल्ह्यातील हर्ष टाकेद या आदिवासी वाड्यावर मांत्रिक बच्चीबाई हिने करणी केल्याच्या संशयावरून बुधीबाई या महिलेचा हिचा गळा आवळून खून केला व पूजेसाठी तिचे डोळे काढले. पोलिस तपासात आणखी एका महिलेचा मृतदेह आढळला.

सांगलीतही उपचार केंद्र

सांगलीत मानसतज्ज्ञ डॉ. प्रदीप पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी आकार फाऊंडेशनच्या माध्यमातून अंधश्रद्धेतून निर्माण झालेल्या विकारांवर उपचार करतात. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच करणी-भानामतीचे प्रकार आढळल्यास मांत्रिकाकडे न जाता समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन कार्यकर्ते राहुल थोरात यांनी केले आहे.

भानामती म्हणजे काय?

भानामती हा सुद्धा अतिंद्रिय प्रकारामध्ये मोडतो. अज्ञात शक्तीला आवाहन करून अचानक घरावर दगडे पडणे, कपडे पेट घेणे, डोळ्यातून, कानातून, नाकातून सुया, खिळे बाहेर पडणे, अंगावर बिब्ब्याच्या फुल्या उमटणे अशा समजुती आहेत. मराठवाड्यात तर भुंकणारी भानामती प्रसिद्ध आहे. या सर्वामागे मानसशास्त्रीय कारणे असल्याचे मानसतज्ज्ञांचे मत आहे. योग्य मानसोपचाराने भानामतीचा आजार दूर होऊ शकतो आणि काही विचित्र घटना घडण्यामागे काही तरी कार्यकारणभाव दडलेला असतो. तो शोधून काढावा लागतो.

करणी-भानामतीवर कायदा, मानसोपचार गरजेचा

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, करणी केल्याच्या संशयातून महाराष्ट्रामध्ये दरवर्षी सरासरी 20 जणांची  हत्त्या होेते. हे खूपच भयानक आहे. मानसिक आजार झालेल्या व्यक्तींवर योग्य उपचार न मिळाल्याने ते बुवा-मांत्रिकांकडे जातात. मांत्रिक मात्र त्यांना  कोणीतरी करणी केल्याचा संशय त्यांच्या डोक्यामध्ये घालतो. त्यातून अनेक ठिकाणी हत्त्या होतात. जादूटोणा विरोधी कायद्याचा वापर करून अशा लोकांना शिक्षा होऊ शकते. यासाठी पोलिसांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. दुसरा भाग म्हणजे करणीचा संशय असलेली वा करणी झाल्याचा दावा करणार्‍यावर मानसोपचार होणे गरजेचे आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे महाराष्ट्रात करणी-भानामती निर्मूलन केंद्राची स्थापना करण्याचे काम सुरू आहे. तिसरे म्हणजे याबाबतचे असलेले वैज्ञानिक प्रबोधन होणे गरजेचे आहे. त्यासाठी अंनिस तसेच मानसोपचारतज्ज्ञ, शिक्षक यांनी पुढाकार घेतला पाहिजे.

महाराष्ट्रात वर्षभरात घडलेल्या घटना

4 जून 2022 : आईनेच करणी केल्याच्या संशयातून मुंबई वाडाळा येथे प्रेयसीच्या मदतीने मुलानेच चाकूने वार करून हत्या.
20 जून 2022 : सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ (ता. मिरज) येथे अब्बास बागवान (रा. सोलापूर) या मांत्रिकाने शेतातील गुप्तधन काढून देतो, म्हणून वनमोर कुुटुंबीयातील 9 जणांना विषारी द्रव देऊन हत्या केली.
18 ते 22 जानेवारी 2023 :  करणीच्या संशयातून पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीत भीमा नदीपात्रात टाकून तीन चिमुरड्यांसह 7 जणांची हत्या.
1 मार्च 2023 : नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील गागलेगाव येथे करणी केल्याच्या संशयातून हणमंत पांचाळ या वृद्धाचा मारहाण करून खून.
23 एप्रिल 2023 : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कोणीकोनूर येथे  करणी-भानामतीच्या संशयातून प्रियांका बेळुंखी व तिची मुलगी मोहिनी यांचा भावकीतील तरुणांनी गळा आवळून खून केला.

Back to top button