सांगली : गडमुडशिंगीच्या घोडकेंचे कबूतर महाराष्ट्र केसरी | पुढारी

सांगली : गडमुडशिंगीच्या घोडकेंचे कबूतर महाराष्ट्र केसरी

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  कोल्हापूर जिल्ह्यातील गडमुडशिंगीच्या सौरभ घोडके यांच्या कबुतराने महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. ते तब्बल 67 तास 40 मिनिटे आकाशात झेपावत राहिले होते. मागील वर्षी 62 तास आकाशात असणार्या कबूतर पेटी विजेता ठरली होती. सांगली जिल्हा केसरीचा किताब किर्लोस्करवाडीच्या रफिक नदाफ यांच्या कबुतराने पटकावला. त्यांचे कबूतर 55 तास 4 मिनिटे आकाशात राहिले.

14 वर्षापूर्वी पिजन फ्लायर्स असोशियन इस्लामपूरचे संस्थापक शिवाजी पवार यांच्याकडून राज्यात कबूतर उडवण्याचा या स्पर्धा सुरू करण्यात आल्या. भारतातील सर्वात मोठ्या मानल्या जाणार्‍या महाराष्ट्र कबूतर केसरी स्पर्धा चुरशीत पार पडली. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून या स्पर्धेसाठी सुमारे 110 कबूतर पेटी चालक सहभागी झाले आहेत. स्पर्धेची शेवटची फेरी सांगलीत झाली.
या कबूतर स्पर्धेतील पहिल्या विजेत्याला 4 लाखाचे बक्षीस असल्याने या स्पर्धेला मोठे महत्व निर्माण झाले आहे. ज्याची कबुतरे जास्त वेळ आकाशात राहतील त्याला विजेता घोषित केले जाते. सीसीटीव्हीच्या माध्यमातून स्पर्धेवर लक्ष असल्याने यंदा 15 व्या वर्षीही ही स्पर्धा विना तक्रार आणि पारदर्शीपणे पार पडली.

बक्षीस वितरण सोहळा सांगली येथे लवकरच पार पडणार आहे. नियोजन शाम मायकल, काशिनाथ दोडमनी, जमीर कुरणे, बाबुल मुश्रीफ, इरफान शेख, रणजित पाटील, जयवंत पाटील, वसीम मुजावर, बागल पटाईत, हैदर सय्यद यांनी केले.

जिल्हा स्तरीय निकाल

सांगली जिल्हा केसरी- रफिक नदाफ किर्लोस्कर वाडी ( 55 तास 4 मिनिट). सातारा जिल्हा केसरी- उस्ताद सिद्धांत अहिवळे फलटण (50 तास 17 मिनिट). कोल्हापूर जिल्हा केसरी- कै. प्रकाश माळी (53 तास 8 मिनिट). कोल्हापूर शहर मर्यादित- बँडवाले (31 तास 45 मिनिट) . कर्नाटक राज्य केसरी-अमित चव्हाण -बेळगाव (41 तास 33 मिनिट). सोलापूर जिल्हा केसरी- बल्लू साळुंखे (48 तास 10 मिनिट). पुणे जिल्हा केसरी- उस्ताद बाळासाहेब खरात-(48 तास 10 मिनिट). कराड शहर मर्यादित- इम्तियाज पटेल-(41 तास 45).

महाराष्ट्र कबूतर केसरी 2023

महाराष्ट्र कबूतर केसरी विजेता- सौरभ घोडके (गडमुडशिंगी ,कोल्हापूर. 67 तास 40 मिनिट). द्वितीय- गणेश दोडमनी (हरिपूर. 65 तास 50 मिनिट). तृतीय- मुरली खणबर्गी (बेळगाव. 62 तास 25 मिनिट). चतुर्थ- अमित काकडे (फलटण. 62 तास 1 मिनिट). पाचवा- विष्णु देशमुख (नेहरूनगर, तासगाव. 58 तास 26 मिनिट).

Back to top button