प्रभू रामचंद्र विसावले होते ते तीर्थक्षेत्र रामलिंग बेट | पुढारी

प्रभू रामचंद्र विसावले होते ते तीर्थक्षेत्र रामलिंग बेट

इस्लामपूर; संग्रामसिंह पाटील : कृष्णा नदीपात्रात असलेल्या रामलिंग बहे (ता. वाळवा) गाव प्रसिद्ध आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रामलिंग बेटावर पर्यटकांची गर्दी होते आहे. विशेषतः शनिवार, रविवार या सुट्टीदिवशी पर्यटकांची संख्या लक्षणीय असते. इस्लामपूरपासून दहा किलोमीटरवर आणि कृष्णा कारखान्यापासून सुमारे सात किलोमीवर कृष्णेच्या तीरावर बहे वसलेले आहे. रामलिंग बेट हे गावच्या पश्चिमेला कृष्णा नदीच्या पात्रात एक किलोमीटर लांब व अर्धा किलोमीटर रुंद खडकावर तयार झाले आहे. कृष्णेच्या पाण्यामुळे निसर्गाचे वरदान गावाला लाभलेले आहे. मंदिराकडे जाण्यासाठी कठडे बांधले आहेत. त्यावरून चालत जाता येते. मंदिर परिसरात आंबा, वड, चिंच व इतर झाडे यांची सावली आहे. रामलिंग बेटाच्या सर्वात उंच अशा मध्यभागी रामलिंग देवालय आहे.

प्रभू रामचंद्र वनवासात असताना जाता-जाता हे नैसर्गिक तीर्थक्षेत्र पाहून येथे विसावले आणि स्नान करून वाळूचे लिंग तयार करून शिवशंकराची पूजा त्यांनी केली, अशी आख्यायिका आहे. म्हणून यास रामलिंग असे म्हणतात. याचा पुरावा श्रीधर स्वामी यांनी लिहिलेला वाल्मिक रामायणात आहे. हल्लीचे राम मंदिर 14 व्या शतकात बांधले आहे. मंदिरासाठी चुना व वीट यांचा वापर केला आहे. गाभारा व शिखर वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकामामुळे सुशोभीत आहे. पर्यटन खात्यामार्फत मजबुतीकरण झाले आहे. मंदिरात महापुराचे पाणी कधीही आलेले नाही.

अकरा मारुती मंदिरापैकी एक

रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या 11 मारुती मंदिरापैकी एक मारुती मंदिर याच बेटावर आहे. अनेक थोर संत, महात्मे, वारकरी व अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांच्या सहवासाने पावन झालेल्या या बेटाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास झालेला आहे. मंदिर परिसर, तटबंदी मुख्य दरवाजा, पुजारी निवास, अंतर्गत रस्ते, बाग-बगीचा नदीपात्रातील रस्ता, अशी पर्यटनासाठी आवश्यक असलेली कामे राज्य सरकारतर्फे पूर्ण झाली आहेत. रामलिंग तीर्थक्षेत्र बेटातील संथ वाहणारे कृष्णामाईचे निळसर पाणी बोडक्या दगडावरून वाहते. तब्बल अंदाजे 450 फूट लांबीचे पात्र या ठिकाणी कृष्णा नदीला लाभले आहे. ते पर्यटकांचे आकर्षण आहे. जुन्या काळातील उंच बांधलेले पूल त्याच्याखाली काळ्याशार, बोडक्या काटेरी दगडावरून जाणारे निळे पाणी मन मोहवून घेते. छोट्या बंधार्‍यावरून चालताना प्रत्यक्ष नदीतून चालत असल्याचा प्रत्यय येतो.

शिवलिंगाची लांबी साडेचार फूट…

कृष्णा नदीपात्रातील बंधार्‍यावरून पुलाखालून पद रस्त्याने रामलिंग बेटावर गेल्यास मंदिर परिसरात प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वाराला 18 दगडी पायर्‍या आहेत. प्रवेशद्वार 1814 ला बांधल्याचा उल्लेख सापडतो. सद्यस्थितीत त्याचा जीर्णोद्धार केला आहे. बांधकाम घडीव दगडी चिरे बसवून केलेले आहे. प्रवेशद्वाराच्या पायर्‍या चढण्यापूर्वी खूप मोठा रिकामा परिसर आहे. या मंदिराचे बांधकाम 150 वर्षांपूर्वी म्हणजेच इ. स. 1734 दरम्यान केल्याचा उल्लेख मिळतो. तत्कालीन वाळू व चुन्याच्या मिश्रणामध्ये विटेमध्ये हे बांधले आहे, असे गेझेटवरून समजते.

Back to top button