मिरजेत अनेक इमारती धोकादायक | पुढारी

मिरजेत अनेक इमारती धोकादायक

मिरज; जालिंदर हुलवान : शहरामध्ये आजही अनेक धोकादायक इमारती आहेत. मात्र त्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. एक वर्षांपुर्वी सर्वे करून, इमारत मालकांना नोटिसा देण्यात आल्या. मात्र काही अपवाद वगळता इमारत पाडण्याची कारवाई करण्यात आलेली नाही. धोकादायक इमारती बाबतही महापालिकेने एखादी दुर्घटना घडण्यापूर्वीच याबाबत कारवाईचा बडगा उगारण्याची गरज आहे.

मिरज शहर हे प्राचिन आहे. त्यामुळे या शहरात अनेक जुन्या इमारती आहेत. त्यापैकी अनेक इमारती धोकादायक बनल्या आहेत. शहराच्या ब्राम्हणपुरी भागात सर्वात जास्त धोकादायक इमारती आहेत. ब्राम्हणपुरीतील जिलेबी चौक, कार्यालय रस्ता, शाळा क्रमांक एक, कुंभार गल्ली, सुतार गल्ली, सोमवार पेठ, सराफ कट्टा रस्ता, मगदूम गल्ली, सतारमेकर गल्ली, गवळी गल्ली, नदीवेस, पवार गल्ली, मोमीन गल्ली, रेवणी गल्ली, दर्गा रोड, मुजावर गल्ली, उदगाव वेस, शनिवार पेठ, मंगळवार पेठ, कृष्णाघाट, भोकरे कॉलनी, गुलमोहर कॉलनी, म्हैसाळ वेस, समतानगर यासह अनेक भागांमध्ये धोकादायक इमारती आहेत. मात्र त्याकडे महापालिका प्रशासन लक्ष देत नाही. या भागातील अनेकांनी महापालिकेकडे वेळोवेळी तक्रारी दिल्या आहेत, पण महापालिकेने त्यांच्या तक्रारींना केराची टोपली दाखविली आहे. शहरात अनेकवेळा या धोकादायक इमारतींमुळे अपघात झालेले आहेत. त्यामुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. अनेकजण कायमचे अपंग झालेले आहेत. काही शाळांच्या इमारतीही धोकादायक बनल्या
आहेत.

यापूर्वी अशा धोकादायक इमारती पडून काही शाळांमधील मुलांचा मृत्यू झालेला आहे. शहराच्या डोणगे गल्लीत शाळा क्रमांक आठची जुनी इमारत आहे. इमारत धोकादायक बनली म्हणून शाळा येथून हलविण्यात आली. नव्याने शाळा बांधण्यात आली. मात्र जुनी इमारत तशीच राहिली आहे. या इमारतीमुळे येथे राहणार्‍यांना आपला जीव मुठीत घेऊन रहावे लागते.

234 अतिधोकादायक, 32 धोकादायक

गेल्या काही वर्षांत मुंबईमध्ये इमारत पडल्याने दुर्घटना घडल्या. त्यानंतर 2022 मध्ये महापालिका प्रशासनाला जाग आली. त्यांनी शहरातील धोकादायक इमारतींचा सर्वे केला. त्यामध्ये 234 इतक्या अतिधोकादायक व 32 इतक्या धोकादायक इमारती सापडल्या. त्या सर्वांना महापालिकेने नोटिसा बजावल्या. त्या घर मालकांना मुदतही देण्यात आली होती. त्यांनी त्या इमारती स्वत:हून उतरवून घेतल्या नाहीत तर महापालिका कारवाई करेल, असा इशाराही महापालिकेने दिला होता. मात्र नोटिसा बजावल्यानंतर त्यावर पुढे कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. सर्वे करण्याचे काम ज्या अधिकार्‍याने केले होते. ते आता महापालिकेत नाहीत. मात्र ज्यांच्याकडे या कामाची जबाबदारी आहे. त्यांनी या उन्हाळ्यातच अशा जुन्या इमारती पाडण्याचे काम करण्याची गरज आहे.

Back to top button