मिरज: बेडग येथे दोन सख्ख्या भावांचा तलावात बुडून मृत्यू | पुढारी

मिरज: बेडग येथे दोन सख्ख्या भावांचा तलावात बुडून मृत्यू

मिरज : पुढारी वृत्तसेवा : बेडग (ता. मिरज) नागरगोजेवाडी येथे तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला. आज (दि.२५) ही घटना घडली. मृतामध्ये अय्याज युनुस सनदी (वय ९) आणि अफान युनुस सनदी (वय ७) अशी त्यांची नावे आहेत. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत माहिती अशी की, युनुस नसरुद्दीन सनदी हे कुटुंबासमवेत बेडग येथे वास्तव्यास असून ते टेम्पो चालक आहेत. युनुस सनदी यांना दोन मुले आहेत. तिसरीमध्ये शिक्षण घेणारा अय्याज सनदी तर पहिलीमध्ये शिक्षण घेणारा अफान असे दोघे शाळेतील परीक्षा देवून आज दुपारी घरी परतले होते.

त्यानंतर दोघे बेडगमधील पाझर तलावामध्ये मासे पकडण्यासाठी गेले. मासे पकडण्यासाठी गेलेले दोघे काही कालावधीनंतर पोहण्यासाठी तलावात उतरले. परंतु तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. यावेळी दोघांचा आरडाओरडा ऐकून त्याच परिसरात असलेले शाहीद मुजावर यांनी दोघांना वाचविण्यासाठी तलावात उडी मारली. दोघांना बाहेर देखील काढण्यात आले. परंतु, दोघांचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला. तलावात बुडून दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची बातमी गावात वार्‍यासारखी पसरली. यानंतर गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

कुटुंबावर दु:खाचा डोंगर

घरातून मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळताच कुटुंबावर अक्षरश: दु:खाचा डोंगर कोसळला. मुलांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु दोन सख्ख्या भावांचे मृतदेह तलावाच्या काठावर पाहून कुटुंबाने हंबरडा फोडला. कुटुंबाचा आक्रोश पाहून उपस्थित ग्रामस्थांना देखील अश्रू अनावर होत होते. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा 

Back to top button