सांगली कृषी विद्यापीठ अहवाल सादर करा : कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचे प्रधान सचिवांना निर्देश | पुढारी

सांगली कृषी विद्यापीठ अहवाल सादर करा : कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचे प्रधान सचिवांना निर्देश

तासगाव : दिलीप जाधव दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी सांगली जिल्ह्यात रांजणी येथे स्वतंत्र कृषी विद्यापीठ मंजूर करण्यात यावे, या आमदार सुमन पाटील यांच्या मागणीला यश आले आहे. राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांना तातडीने याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तर अहवाल प्राप्त होताच मंजुरी देण्यासाठी पुढील कार्यवाही लवकर करणार असल्याची ग्वाही कृषी मंत्री अब्दूल सत्तार यांनी आमदार सुमन पाटील यांना दिली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात तासगाव कवठेमहांकाळच्या आमदार सुमन पाटील यांनी सांगली जिल्ह्यात रांजणी येथे स्वतंत्र असे कृषी विद्यापीठ मंजूर करावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आमदार पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सांगली, कोल्हापूर, सातारा तसेच सोलापूर भाग कृषीप्रधान आहे. भागाने कृषीच्या मदतीने ग्रामीण अर्थकारणाला गती दिली आहे. शेतीमध्ये वेगाने बदल होत आहेत. या बदलांना सामोरे जाताना कृषी शिक्षण, संशोधन होणे फार गरजेचे आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्र या भागांसाठी जशी स्वतंत्र कृषी विद्यापीठे आहेत.

याच धर्तीवर पश्चिम-दक्षिण महाराष्ट्रासाठी सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये स्वतंत्र कृषी विद्यापीठ स्थापन करावे. कोल्हापूर जिल्हा हा शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर आणि विकसित आहे. जिल्ह्यात शिवाजी विद्यापीठ आहे. तर सातारा जिल्ह्यातील सातारा येथे रयत शिक्षण संस्थेचे आशिया खंडातील नामांकित असे शैक्षणिक संकुल आहे. तर सोलापूर जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ आहे.
सांगली जिल्ह्यात असे कोणतेही शैक्षणिक संकुल अथवा शासकीय संस्था यापैकी काहीही नाही. याचा विचार करता सांगली जिल्ह्यामध्ये स्वतंत्र कृषी विद्यापीठ गरजेचे आहे. तासगाव – कवठेमहांकाळ मतदारसंघाच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी येथील शासनाच्या ४५० एकर जागेवरती हे कृषी विद्यापीठ उभे करता येऊ शकते. त्याला मंजूरी द्यावी.

लवकरच विद्यापीठाचा विषय मार्गी लावणार : कृषीमंत्री

आमदार सुमन पाटील यांच्या मागणीची दखल घेत कृषी मंत्री अब्दूल सत्तार यांनी याबाबतचा अहवाल तातडीने पाठवा असे निर्देश कृषी मंत्रालयाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांना दिले. सांगली जिल्ह्यासाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठ मंजूर व्हावे यासाठी आपण अनुकूल आहोत. प्रशासनाकडून अहवाल प्राप्त होताच पुढील कार्यवाही तातडीने सुरु करुन हा प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांनी आमदार सुमन पाटील यांना दिली आहे.

मंजूरी मिळेपर्यंत पाठपुरावा करणार : आ. सुमन पाटील

याबाबत बोलताना आमदार सुमन पाटील म्हणाल्या, सांगली जिल्ह्यामध्ये स्वतंत्र कृषी विद्यापीठ स्थापन झाल्यास भागातील शेतकरी, पशुपालक यांना नवनवीन संशोधन उपलब्ध होईल. अधिक उत्पन्न मिळावे तसेच भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीमधील दर्जेदार उच्च ज्ञान भागात उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांना कृषीचे शिक्षण घेता येईल. तसेच ऊस, द्राक्षे, डाळिंब या पिकांवर संशोधन करता येईल.

शेतकऱ्यांनाही स्थानिक भागातच उच्च दर्जाचे कृषी तंत्रज्ञान मिळू शकते. या साऱ्या गोष्टींचा विचार करून सांगली जिल्ह्यात रांजणी येथेच कृषी विद्यापीठ मंजूर व्हावे, अशी मागणी केली आहे. राज्याचे कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांनी सकारात्मक असा प्रतिसाद दिला आहे. आता विद्यापीठास मंजूरी मिळेपर्यंत सातत्याने पाठपुरावा करणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button