बैलगाडी शर्यतीला नियमांचा घुणा; जाचक अटींमुळे कारवाईचा धोका कायम | पुढारी

बैलगाडी शर्यतीला नियमांचा घुणा; जाचक अटींमुळे कारवाईचा धोका कायम

सांगली; सचिन सुतार :  गावोगावी भरणार्‍या यात्रा-जत्रा, उरूस यामध्ये हमखास बैलगाडी, घोडागाडी शर्यत घेण्यात येते. शर्यतीवरील बंदी उठवण्यात आली असली तरी केवळ अशक्य असणार्‍या नियमावलीमुळे शर्यती घेणे कठीण झाले आहे. त्यामुळे शर्यत शौकिनांतून नाराजी व्यक्त होत आहे.

प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत असणार्‍या अधिनियम, 1960 (59) नियम 2017 चे पालन करून विना लाठी-काठी बैलगाडी शर्यत आयोजित करण्यासाठी असणारे नियम पालन करणे आयोजकांना जास्तच कठीण आहे. त्यातच जिल्हाधिकारी, नायब तहसीलदार, पोलिस उपनिरीक्षक, पशुवैद्यकीय अधिकारी, प्राणीक्लेश प्रतिबंध समिती यांच्याकडून लागणार्‍या परवानगी आणि तपासणी अहवाल पूर्तता करणे. शर्यतीच्या अगोदर 15 दिवस 50 हजार रुपये अनामत रक्कम भरून कार्यक्रम निश्चित करणे बंधनकारक आहे. इतके सर्व करूनही राऊंडच्या अंतराची फक्त एक हजार मीटरची अट, गाडीच्या मागे – पुढे इतर वाहने पळवणे या नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे नियमांचा भंग होण्याची शक्यता अधिक असते. तसे झाल्यास अनामत रक्कम जप्त होते तसेच आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याची वेळ येते.

सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवली, मात्र जाचक नियमावलीमुळे शर्यती आयोजित करण्यास अनेक अडथळे पार करावे लागतात. त्यामुळे अनेक ठिकाणी बैलगाडी शर्यती आयोजित करताना परवानगी घेण्याचे टाळले जाते. शर्यती न झाल्याने देशी खिलार जात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यासाठी जाचक नियमांमध्ये शिथिलता आणून ग्रामीण भागातील उत्साह टिकवावा, अशी मागणी शर्यतप्रेमींतून होत आहे.

गावगाड्यातील रांगडा खेळ म्हणून बैलगाडी शर्यतीकडे पाहिले जाते. पोटच्या मुलांप्रमाणे खुराक, तालीम देऊन बैलप्रेमी शेतकरी शर्यतीच्या खोंडाना जपतो. अनेक ग्रामीण खेळ काळाच्या ओघात बंद होत आहेत. जाचक अटींमुळे बैलगाडी शर्यती घेणे अडचणीचे होत आहे. मात्र, योग्य ती काळजी घेऊन नियमांचे पालन करून बैलगाडी शर्यती झाल्या पाहिजेत. तरच पारंपरिक ग्रामीण खेळ जपला जाणार आहे.

– गजानन जाधव, प्राणी क्लेश प्रतिबंध समिती सदस्य

शर्यतीसाठी नियम :

शर्यतीसाठी योग्य धावपट्टी
जमीन ज्या विभागाची असेल त्यांचे नाहरकत प्रमाणपत्र
शर्यतीचे अंतर फक्त एक हजार मीटर
बैलांच्या वैद्यकीय तपासणीचे प्रमाणपत्र
गाडीवानाचे ओळखपत्र, बैलाचे छायाचित्र
स्पर्धेवेळी पशू रुग्णवाहिका असणे आवश्यक
गाडीत काठी, चाबूक, बॅटरी याचा वापर करण्यास मनाई
बैलांना उत्तेजक देण्यास मनाई
शर्यत मार्गावर दोन्ही बाजूला कठडे उभारणे
संपूर्ण शर्यतीचे छायाचित्रीकरण करून उपविभागीय अधिकारी यांना सादर करणे

राजकीय वरदहस्ताला नियमांची सूट

परवानगी आणि अंतराची अट यासाठी राजकीय वरदहस्त असल्यास प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जाते किंवा अर्थपूर्ण भेटीगाठी झाल्यास कारवाईचा फार्स दाखविण्यात येतो. असे अनेकदा दिसून येते.

Back to top button