Uttarakhand Forest Fire: नैनितालमध्ये जंगल जळतंय, हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने आग विझवण्याचे प्रयत्न | पुढारी

Uttarakhand Forest Fire: नैनितालमध्ये जंगल जळतंय, हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने आग विझवण्याचे प्रयत्न

पुढारी ऑनलाईन डेस्क: उष्मा वाढल्याने नैनितालच्या जंगलात मोठ्या प्रमाणात आगीच्या घटना घडत आहेत. गेल्या 24 तासांत उत्तराखंड राज्यात 31 ठिकाणी जंगलाला आग लागल्याची नवीन प्रकरणे समोर आली आहेत. वनविभागाच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारीही राखीव जंगलांमधून मोठ्या प्रमाणात जंगलाला आग लागण्याच्या घटना घडल्या. दरम्यान हवाई दलाची मदत घेऊन MI-17 द्वारे आग विझवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. (Uttarakhand Forest Fire)

अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक निशांत वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत राखीव जंगलात 29 आणि नागरी किंवा वन पंचायतींमध्ये 29 जंगल आगीच्या घटना घडल्या आहेत. एकूण 33.34 हेक्टर जंगल बाधित झाले आहे. मात्र, कोठेही मनुष्यहानी झालेली नाही. गढवाल विभागातील टिहरी, पौरी, उत्तरकाशी, रुद्रप्रयाग आणि चमोली जिल्ह्यातील जंगले सतत जळत आहेत. बहुतांशी पाइनचे जंगल असल्याने आग झपाट्याने पसरत आहे. वन कर्मचारी आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न करत आहेत. एका ठिकाणी आग विझवली की दुसऱ्या ठिकाणी भडकते. आगीत मोठ्या प्रमाणात वनसंपत्तीचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. (Uttarakhand Forest Fire)

Uttarakhand Forest Fire: चमोलीच्या जंगलात पुन्हा आग

चमोली जिल्ह्यातील जंगलात पुन्हा आग लागली आहे. शुक्रवारी जिल्ह्यात पाच वेगवेगळ्या ठिकाणी जंगलाला आग लागल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वनसंपत्ती नष्ट झाली आहे. गोपेश्वरजवळील कोथियालसैन आणि गविल्सच्या जंगलात शुक्रवारी आग लागली. पाइनच्या जंगलात लागलेल्या आगीने अचानक रौद्र रूप धारण केले. माहिती मिळताच गोपेश्वर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले व त्यांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. दुपारी देवखळच्या जंगलात आग लागली. काही वेळातच आग जंगलाच्या मोठ्या भागात पसरली.

आगीच्या घटनांमधील मदतीसाठी नियंत्रण कक्ष

वनविभागाकडून मुख्यालयात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. याशिवाय जंगलातील आगीबाबत माहिती देण्यासाठी क्रमांकही जारी करण्यात आले आहेत. तुम्ही 18001804141, 01352744558 वर कॉल करू शकता. तुम्ही 9389337488 आणि 7668304788 या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारेही माहिती देऊ शकता. याशिवाय तुम्ही राज्य आपत्ती नियंत्रण कक्ष डेहराडूनला 9557444486 आणि हेल्पलाइन 112 वर आगीच्या घटनेची माहिती देऊ शकता.

Back to top button