आटपाडी : आवळाईत विना परवाना बसवलेला शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला; ग्रामस्थांत नाराजी | पुढारी

आटपाडी : आवळाईत विना परवाना बसवलेला शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला; ग्रामस्थांत नाराजी

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : आटपाडी तालुक्यातील आवळाई येथे सोमवारी पहाटे गावातील मरिमाता मंदिरासमोर मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा सात फुटी पुतळा बसविण्यात आला. सोमवारी सकाळी अकरा वाजता मोठ्या पोलीस बंदोबस्तात महसूल आणि पोलीस प्रशासनाने हा पुतळा हटवला. त्यानंतर ग्रामस्थांनी त्याच ठिकाणी छोटा पुतळा बसवला. यावेळी प्रशासनाने परवानगी घेऊन पुतळा बसावावा असे आवाहन केले. त्यानंतर ग्रामस्थांशी चर्चा करुन दुसरा पुतळा देखील काढण्यात आला. पुतळा हटवल्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

आवळाई येथील मरिमाता मंदिरासमोर मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा सात फुटी पूर्णाकृती पुतळा सोमवारी पहाटे अज्ञांतांनी बसवला. सकाळी ग्रामस्थांना आणि त्यानंतर महसूल व पोलीस प्रशासनाला पुतळा बसविल्याची माहिती मिळाली त्यामुळे मोठी खळबळ उडाली.

प्रांत संतोष भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, विटा पोलीस निरीक्षक संतोष डोके पोलीस बंदोबस्तात आवळाई येथे गेले. त्यांनी ग्रामस्थांचा विरोध डावलून शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला. त्यानंतर त्याच ठिकाणी ग्रामस्थांनी छोटा पुतळा बसवला. यावेळी पोलीस आणि युवकांमध्ये वादावादी झाली. पुतळा काढल्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते.

दरम्यान वातावरण बिघडल्याने विटा आणि सांगलीतून मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला. त्यानंतर महसूल व पोलीस प्रशासनाने ग्रामस्थांशी चर्चा केली. पुतळा परवानगी घेऊन पुतळा बसवावा अशी भूमिका प्रशासनाने घेतली होती.परंतु बसवलेला पुतळा हटवला म्हणून शिवप्रेमी नाराज झाले होते.

वाढलेला तणाव आणि मोठया पोलिस बंदोबस्तात पूर्णाकृती पुतळा परत देण्याचे आणि परवानगी नंतर पुतळा बसविण्याचे ठरल्यानंतर छोटा पुतळा देखील हटविण्यात आला. दरम्यान याप्रकरणी आटपाडी पोलिसांत कोणताही गुन्हा अद्याप दाखल झालेला नाही.

आवळाई येथे पहाटे आणि सकाळी बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन्ही पुतळे हटविण्यात आल्याने वातावरण तणावपूर्ण आहे. गावातील परिस्थिती पाहता पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.

अधिक वाचा :

Back to top button