Ravindra Jadeja : रवींद्र जडेजा एक विकेट घेताच रचणार इतिहास! | पुढारी

Ravindra Jadeja : रवींद्र जडेजा एक विकेट घेताच रचणार इतिहास!

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत विशेष विक्रम करण्याची संधी आहे. या सामन्यात जडेजाने 1 बळी घेतल्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5000 धावा आणि 500 ​​बळी घेणारा तो केवळ दुसरा भारतीय खेळाडू ठरेल. आतापर्यंत फक्त भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनीच हा टप्पा गाठला आहे.

जडेजाचे (Ravindra Jadeja) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धमाकेदार पुनरागमन झाले असून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नागपूर आणि दिल्ली कसोटीत त्याने शानदार कामगिरी केली. या दोन्ही सामन्यांत त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. मालिकेतील तिसरा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर होणार आहे.

कपिल देव यांची बरोबरी करण्यासाठी जडेजा सज्ज

जडेजाने (Ravindra Jadeja) 62 कसोटी, 171 एकदिवसीय आणि 64 टी-20 सामने खेळले असून त्याने अनुक्रमे 2619, 2447 आणि 457 धावा केल्या आहेत. तर 259, 189 आणि 51 विकेट्स घेतल्या आहेत. तो 500 आंतरराष्ट्रीय विकेट घेण्यापासून फक्त एक विकेट दूर आहे. असे झाल्यास 500 बळींसह 5000 धावा करणारा तो भारताचा दुसरा खेळाडू ठरेल.

माजी कर्णधार आणि अष्टपैलू कपिल देवने (Kapil Dev) यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 9031 धावा केल्या असून 687 विकेट्स घेतल्या आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 131 कसोटी आणि 225 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात त्यांनी अनुक्रमे 5248 आणि 3783 धावा केल्या, तर कसोटीमध्ये त्यांनी 434 आणि वनडेमध्ये 253 बळी मिळवले आहेत. या विक्रमामुळे कपिल यांची गणना भारताच्या सर्वोत्तम अष्टपैलूं खेळाडूंमध्ये होते.

जडेजाने बॉर्डर-गावसकर मालिकेतून तब्बल 5 महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन केले. ऑगस्टमध्ये झालेल्या आशिया कपमध्ये दुखापत झाल्यानंतर तो संघातून बाहेर पडला होता. भारतीय संघाकडून खेळण्यापूर्वी आपली तंदुरुस्ती सिद्ध करण्यासाठी जडेजाने सौराष्ट्रकडून एक रणजी सामना खेळला, ज्यामध्ये त्याने दुसऱ्या डावात 7 बळी घेतले.

विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत जडेजाची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. नागपूर आणि दिल्ली येथे झालेल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात जडेजा सामनावीर ठरला होता. जडेजाने 2 डावात 96 धावा केल्या असून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. याखेरीज गोलंदाजीत कहर करताना त्याने 17 बळी घेतले आणि सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो पहिल्या स्थानावर आहे.

WTC फायनल हे भारताचे लक्ष

चार सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मधील पहिले दोन सामने जिंकून टीम इंडिया 2-0 ने आघाडीवर आहे. इंदूरमध्येही भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यात यश मिळवले तर मालिकेत 3-0 ने विजयी आघाडी घेता येईल. त्याचबरोबर रोहित सेना दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करेल. गेल्या वेळी डब्ल्यूटीसी फायनलमध्ये भारताला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंदूर कसोटी जिंकल्यानंतर टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या पॉइंट टेबलमध्ये पहिले स्थान मिळेल.

Back to top button