सांगली : कडेगावातील नेर्ली खोर्‍यात तीव्र टंचाई | पुढारी

सांगली : कडेगावातील नेर्ली खोर्‍यात तीव्र टंचाई

कडेगाव; रजाअली पिरजादे : कडेगाव तालुक्यातील नेर्ली खोर्‍यातील अनेक लघुपाटबंधारे तलाव, बंधारे यासह अनेक विहिरी पाण्याअभावी कोरड्या पडल्या आहेत. भूगर्भातील पाणीपातळीही खालावली आहे. तालुक्यातील या भागातील हजारो शेतकर्‍यांना उन्हाळ्यापूर्वीच कडक टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. या परिसरात शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नेर्ली खोर्‍यात पाण्याअभावी ऊस पिकासह अन्य पिके वाळू लागली. तातडीने टेंभूचे आवर्तन सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
फेब्रुवारी महिना सुरू आहे. कडक उन्हाची सुरुवात झाली आहे. शाळगाव खोर्‍यातील काही भाग व कडेगाव जुना चिखली रस्ता परिसरातील काही भागात तीव्र पाणी टंचाई भासू लागली आहे.

कडेगाव तलावसह शाळगाव – बोंबळेवाडी तलावाची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. तालुक्यात ताकारी, टेंभू, आरफळ अशा तीन योजना कार्यान्वित आहेत. या तीन योजना असून देखील पाणी टंचाई निर्माण होत आहे.

सध्या कडेगावातून टेंभूचे पाणी पुढे आटपाडीच्या दिशेने जात आहे. परंतु कडेगाव तालुक्यातील तलाव भरून घेतले जात नाहीत. सध्या शिवाजीनगर तलावात टेंभूचे पाणी सोडल्याने हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. या तलावातून पाणी उचलून पुढे जात आहे. परंतु शिवाजीनगर तलावापासून काही अंतरावर असलेला अन्य लहान-मोठ्या तलावात पाणी पूर्ण क्षमतेने सोडले जात नाही.
नेर्ली, अपशिंगे, कोतवडे, खंबाळेसह अनेक गावांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पाण्याअभावी ऊस पिकासह अन्य पिके वाळू लागली आहेत.

आंदोलनाशिवाय पाणी नाही

कडेगाव तालुक्यात प्रतिवर्षी टेंभू योजनेचे आवर्तनासाठी व पाण्यासाठी सतत संघर्ष करावा लागला आहे. प्रत्येकवर्षी पाण्यासाठी आंदोलने केल्याशिवाय पाणी मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे. यावर्षी पाण्यासाठी शेतकर्‍यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

पाणीपट्टी घेता; मग वेळेत पाणी का देत नाही

प्रतिवर्षी ऊस उत्पादक शेतकर्‍यांची गाळपाला जाणार्‍या साखर कारखान्याकडून ऊस बिलातून भरमसाठ पाणीपट्टी कपात केली जाते. परंतु प्रतिवर्षी आवर्तनास विलंब होतो. त्यामुळे शेतकर्‍यांना वेळेत पाणी मिळते. त्यामुळे पाणीपट्टी घेता मग पाणी का देत नाही? तातडीने पाण्याचे आवर्तन सुरू करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू.
– राजाराम शिंदे, सरपंच, नेर्ली

Back to top button