सांगली : विटा मायणी रस्त्यावर दुचाकींच्या अपघातात एक जण जागीच ठार | पुढारी

सांगली : विटा मायणी रस्त्यावर दुचाकींच्या अपघातात एक जण जागीच ठार

विटा; पुढारी वृत्तसेवा : विटा ते मायणी रस्त्यावर नागेवाडीजवळ दोन दुचाकींच्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार झाला. तर अन्य तीनजण जखमी झाले. ही घटना गुरुवार (दि.२) दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत विटा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

याबाबत घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, खानापूर तालुक्यातील भाग्यनगर येथील शंकर यशवंत जगताप आणि त्यांचे बंधू कुंडलीक हे दोघे आपल्या दुचाकीवरून भाग्यनगर येथून विट्याकडे निघाले होते. दुचाकी भाग्यनगर येथून विटा ते मायणी या प्रमुख रस्त्यावर आल्यानंतर भाग्यनगर फाट्यानजीक यशवंत कारखान्याच्या अलीकडे पाठीमागून अचानक आलेल्या दुचाकीची आणि जगताप यांच्या दुचाकीची जोरदार धडक झाली.

या अपघातात शंकर जगताप यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांना धडक देणाऱ्या दुचाकी वरील महादेव दामोदर मदने आणि विशाल गेंड (दोघे रा.शिखर शिंगणापूर,जि. सातारा) या दोघांसह मृत शंकर यांचे बंधू कुंडलिक जगताप हे तिघे गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन रुग्णवाहिकेला पाचारण केले. अपघातातील तिन्ही जखमींना पुढील उपचारासाठी विट्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत शंकर जगताप हे तामिळनाडू येथील धरमपुरी येथे गलाई व्यवसाय करीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, एक मुलगी आणि आई असा परिवार आहे.

अधिक वाचा : 

Back to top button