sangli become Grapes Hub : सांगली जिल्हा बनतोय ‘द्राक्ष हब’! पाच कोटींची उलाढाल | पुढारी

sangli become Grapes Hub : सांगली जिल्हा बनतोय ‘द्राक्ष हब’! पाच कोटींची उलाढाल

तासगाव; दिलीप जाधव : सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांनी गेल्या आठ-दहा वर्षांच्या कालावधीत द्राक्षांच्या विविध जाती विकसित केल्या आहेत. जिल्ह्यात जवळपास 33 हजार 791 हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षबागातून जवळपास 11 जातींचे सुमारे 9 लाख टन द्राक्षांचे उत्पादन घेतले जात आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील द्राक्षशेतीची वार्षिक उलाढाल 5 हजार कोटींच्या पुढे गेलेली आहे. सांगली जिल्हा ‘द्राक्षे हब’ म्हणून उदयास येऊ लागला आहे. (sangli become Grapes Hub)

1962 साली सांगली जिल्ह्यात सर्वप्रथम नांद्रे या गावात द्राक्ष बागेची लागवड करण्यात आली. त्यानंतर 1965 च्या दरम्यान जिल्ह्यात द्राक्षबागांच्या लागवडीखालील क्षेत्र वाढू लागले. सुरुवातीला भोकरी, बेंगलोर,‘सिलेक्शन सेव्हन’ जातीच्या द्राक्ष बागांची लागवड जिल्ह्यात केली जात होती. (sangli become Grapes Hub)

1965 ला जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांनी नाशिक जिल्ह्यातून ‘थॉमसन’ या नवीन जातीची द्राक्षकाडी आणून द्राक्षबागेची लागवड केली. त्यानंतर जिल्ह्यात द्राक्ष बागाच्या लागवडीचे क्षेत्र जसजसे वाढत जात होते, तसतसे या जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी द्राक्षांच्या नवीन जाती शोधून काढायला सुरुवात केली. द्राक्ष बागेमध्ये विशिष्ट प्रकारचा घड आढळून आल्यास त्या झाडावरील काडी काढून नवीन जात विकसित करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी पुढाकार घेतला. (sangli become Grapes Hub)

गेल्या 30 ते 40 वर्षांच्या कालावधीमध्ये सांगली जिल्ह्यात थॉमसननंतर तास ए गणेश’ सोनाका, शरद सीडलेस, सुपर सोनाका, गोविंद, एसएसएन, ज्योती, कृष्णा, अनुष्का, क्रिमसन या जातीच्या द्राक्ष बागांची लागवड केली जात आहे. बहुसंख्य जाती सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार शेतकर्‍यांनीच विकसित केलेल्या आहेत. नुकत्याच काही दिवसापूर्वी कवलापूर येथील पोतदार बंधूंनी ‘सिद्ध गोल्डन’ ही नवीन जात विकसित केली आहे. (sangli become Grapes Hub)

आजमितीस जिल्ह्यामध्ये 33 हजार 791 हेक्टर क्षेत्रावर विविध जातींच्या द्राक्षबागांची लागवड करण्यात आलेली आहे. यापैकी अंदाजे 26 हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षे बाजारपेठेत जात असतात. बाजारपेठेत जाणार्‍या द्राक्षांपैकी सुमारे 5 हजार हेक्टरवरील द्राक्षांची निर्यात होत असते. सुमारे 18 हजार टन द्राक्षांच्या निर्यातीमधून जिल्ह्यात शेतकर्‍यांना 750 कोटी रुपये आर्थिक उत्पन्न मिळत आहे.

जिल्ह्यातील सुमारे 21 हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षे देशांतर्गत बाजारपेठेत जातात. यामध्ये तामिळनाडू, चेन्नईपासून दिल्लीतील बाजारपेठ, तर मुंबईपासून पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरातील बाजारपेठांचा समावेश आहे. सांगली जिल्ह्यातील सुमारे 8 लाख 40 हजार टन द्राक्षे देशांतर्गत बाजारपेठेत जात असतात. या माध्यमातून द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना सुमारे 3 हजार 150 कोटी रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळते.

याशिवाय सांगली जिल्ह्यातील सुमारे 8 हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षबागातून बेदाणा निर्मिती केली जाते. जिल्ह्यामध्ये सुमारे 80 हजार टन इतक्या बेदाण्याची निर्मिती होते. हा बेदाणा देशासह देशाबाहेरील बाजारपेठेमध्येही विक्रीला जातो. बेदाणा विक्रीच्या माध्यमातून या जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना सुमारे 1 हजार 200 कोटी रुपये आर्थिक उत्पन्न मिळते.

अधिक वाचा :

Back to top button