सांगली : धनलाभ करून देण्याच्या आमिषाने अडीच तोळे लंपास | पुढारी

सांगली : धनलाभ करून देण्याच्या आमिषाने अडीच तोळे लंपास

कासेगाव; पुढारी वृत्तसेवा : केदारवाडी (ता. वाळवा) येथील शालन नामदेव माने या महिलेला धनलाभ करून देतो, असे सांगून अज्ञाताने घरातील अडीच तोळे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. माने यांनी कासेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, केदारवाडी येथे नामदेव माने यांच्या घरी शुक्रवारी दुपारी अज्ञात इसम आला होता. त्याने माने यांचे डोळ्याचे ऑपरेशन झाल्याचा गैरफायदा घेत नामदेव यांच्या पत्नी शालन माने व जाऊ शोभा माने यांना धनलाभ करून देतो, अशी खोटी बतावणी केली. त्यासाठी तुमचे दागिने द्यावे लागतील, असे सांगितले.

धनलाभाच्या आशेपोटी शालन यांनी एक गंठण, बोरमाळ व अंगठी असे अडीच तोळ्याचे दागिने संशयिताला दिले. संशयिताने ते पुडीत बांधले. तसेच त्याने आपल्या स्वतःजवळच्या दोन पुड्या काढल्या. त्या पुडीत तांदूळ व गहू होते. हातचलाखीने त्या पुड्या बदलून दागिन्यांची पुढी घेऊन तो पसार झाला. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Back to top button