अलमट्टी उंची वाढीला व्यापारी असोसिएशनचा विरोध; कर्नाटकवर दबाव आणण्याची मागणी | पुढारी

अलमट्टी उंची वाढीला व्यापारी असोसिएशनचा विरोध; कर्नाटकवर दबाव आणण्याची मागणी

सांगली; पुढारी वृत्तसेवा : अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची खटपट चालू आहे. अलमट्टी धरणाची उंची पाच मीटरने वाढविल्यास पावसाळ्यात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यावर महापुराची टांगती तलवार कायम राहील. त्यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार, खासदार यांनी एकत्र यावे. केंद्र व राज्य शासनाला गांभीर्याने दखल घेण्यास भाग पाडावे. अलमट्टीची उंची वाढवू नये यासाठी कर्नाटकवर दबाव आणावा, अशी मागणी सांगलीतील व्यापारी संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे.

व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा म्हणाले, कर्नाटकातील अलमट्टी धरणाची सध्याची उंची 519 मीटर एवढी आहे. आणखी पाच मीटरने उंची वाढवण्याचे वक्तव्य कर्नाटकमधील राज्यकर्ते करत आहेत. उंची वाढवण्याची सर्व तयारीही त्यांनी केली आहे. अशा परिस्थितीत अलमट्टीची उंची वाढू शकते. त्याचा लाभ कर्नाटकला होईल. मात्र कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. पावसाळ्यात धो धो पडणारा पाऊस आणि धरणांमधून केला जाणारा पाण्याचा विसर्ग यांचा योग्य समन्वय न झाल्यास कोल्हापूर आणि सांगलीत महापुराची गंभीर स्थिती उद्भवू शकते, याचा अनुभव यापूर्वी घेतलेला आहे. सलगच्या महापुराने सांगलीतील पूरग्रस्त व्यापार्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आता धरणाची उंची वाढल्यास गंभीर स्थितीत वाढ होणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अलमट्टी धरणाची उंची वाढवली जाऊ नये, यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा होणे गरजेचे आहे.

किरकोळ किराणा माल व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, महापुराने सांगलीतील पूरग्रस्त व्यापार्‍यांचे सातत्याने मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, यासाठी कर्नाटक सरकारवर दबाव आणला पाहिजे.

अधिक वाचा :

Back to top button