सांगली : वाळवा तालुक्यात मुलींचा जन्मदर घटला | पुढारी

सांगली : वाळवा तालुक्यात मुलींचा जन्मदर घटला

इस्लामपूर; संदीप माने : वाळवा तालुक्यात गेल्या 8 वर्षांपासून मुलींचा जन्मदर घसरत आहे. एक हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर 850 ते 900 च्या घरात आहे. वंशाला दिवा पाहिजे, ही मानसिकता अजूनही लोकांमध्ये रूजली आहे. यामुळे शासनाच्या बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाला पुन्हा गती देण्याची गरज निर्माण झाली आहे.

वाळवा तालुका शैक्षणिक, उद्योग, सहकार, शेती आदी क्षेत्रात अग्रेसर आहे. तालुक्यात सांस्कृतिक चळवळही रुजली आहे. लोकांचे जीवनमानात आमूलाग्र बदल झाला आहे. लोकांचा आर्थिक, शैक्षणिक स्तर उंचावला आहे. कुटुंबात मुलगाच जन्माला यावा, अशी मानसिकता वाढू लागली आहे. तालुक्यात गेल्या आठ वर्षापासून 1000 मुलांच्या पाठीमागे मुलींचा जन्मदर 800 ते 900 च्या घरात आहे. ही चिंतेची बाब आहे. मागील 8 वर्षातील हजार मुलामागे मुलींचे प्रमाण- सन 2014-15(878 मुली), सन 2015-16 (873), सन 2016-17 (875), सन 2017-18 (919), 2018-19 (855), सन 2019-20 (890), सन 2020-21 (894), सन 2021-22 (898).

केवळ सन 2017-18 या सालात 919 मुलींचे प्रमाण हे सर्वाधिक आहे. मात्र त्यानंतर मुलींचा जन्मदर घटला आहे. सन 2015 पासून केंद्र शासनाने बेटी बचाओ, बेटी पढाओ हे अभियान कमी जन्मदर असलेल्या देशातील 100 जिल्ह्यात सुरू केले. महिला व बालविकास मंत्रालय, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, मानव संसाधन विकास मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविण्यात आले आहे. लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत आणि मुलींच्या सुरक्षेबद्दल खात्री देणे हे उद्दिष्टे ठेवण्यात आली आहेत. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या चळवळीला सामाजिक संस्थांनी गती देण्याची गरज आहे. त्यामुळे मुलींच्या जन्मदरात काहीसा फरक पडू शकतो.

Back to top button