सांगली : ऊस तोडणी मजुराअभावी हंगाम लांबण्याची चिन्हे | पुढारी

सांगली : ऊस तोडणी मजुराअभावी हंगाम लांबण्याची चिन्हे

कडेगाव;  संदीप पाटील :  कडेगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सर्वच कारखान्यांचा गळीत हंगाम मोठ्या जोमात सुरू झाला आहे . परंतु, यावर्षी ऊस तोडणी मजुरांची मोठी कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे आडसाली ऊस घालविण्यासाठी शेतकरी अक्षरशः हैराण झाला आहे .

कडेगाव तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे तालुक्यातील हजारो हेक्टरवरील ऊस पावसाने भुईसपाट झाला होता. हुमणी किडीनेही शेकडो हेक्टरवरील उसाची अक्षरशः चाळण झाली आहे.

बहुतांश ठिकाणी उसावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने ऊस वाळून मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ऊस लवकर गाळपासाठी पाठविण्यासाठी शेतकर्‍यांची मोठी धडपड सुरू आहे. परंतु, यावर्षी ऊस तोडणी मजुरांची संख्या कमी असल्याने शेतकर्‍यांची अवस्था मोठी बिकट झाली आहे. तोडणी मजुरांना पैसे देऊनही मजूरच न आल्याने ट्रॅक्टर व ट्रकमालकांचे धाबे दणाणले आहेत.

काही ऊस तोडणी टोळीत 4 ते 5 मजूर असल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे दोन दिवसांत एक खेप कारखान्यांकडे गाळपासाठी पाठवली जात आहे. 1 एकर ऊस तोडण्यासाठी या मजुरांना 5 ते 6 दिवस लागत आहे. त्यामुळे तोडणी हंगाम ठरवणे कारखाना कर्मचार्‍यांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे. तोडणी मजुरांची कमतरता असल्याने आडसाली ऊस तोडणी हंगाम अजून काही दिवस लांबण्याची चिन्हे आहेत.

ट्रॅक्टर व ट्रकमालकांचे धाबे दणाणले

तोडणी मजुरांना व मुकादम यांना पैसे देऊनही मजूर न आल्याने ट्रॅक्टरमालकांचे यावर्षी धाबे दणाणले आहेत. ट्रॅक्टर मालक कारखान्यांकडून ऊस तोडणी करण्यासाठी 6 ते 7 लाख रुपये उचल घेऊन ते मुकादम यांच्यामार्फत एका टोळीमागे 13 ते 14 ऊस तोडणी मजुरांना देतात. परंतु, यावर्षी मजूरच न आल्याने ऊस तोडणीचा धंदा कसा करायचा व कारखान्यांकडून घेतलेली रक्कम व वाहन कर्जाची रक्कम कशी फेडायची, या चिंतेने ट्रॅक्टर व ट्रकमालकांचे धाबे दणाणले आहेत.

Back to top button