पराभव दिसत असल्याने संविधान बदलण्याची भाषा : चंद्रकांत पाटील | पुढारी

पराभव दिसत असल्याने संविधान बदलण्याची भाषा : चंद्रकांत पाटील

पुणे : पुढारी वृत्तसेवा : काँग्रेससह विरोधकांना पराभव स्पष्टपणे समोर दिसत आहे. त्यामुळे ते संविधान बदलाची भाषा करत आहेत. वास्तविक, काँग्रेसने स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी संविधानात वारंवार दुरुस्त्या केल्या असल्याची टीका उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. संविधान रथाचे उद्घाटन मंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी रिपाइंचे नेते परशुराम वाडेकर, मंदार जोशी, बाळासाहेब खंकाळ, बापू ढाकले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अ‍ॅड. राहुल म्हस्के, भारत भोसले, माया पोसते, उज्ज्वला सर्वगोड, जितेश दामोदरे, अतुल साळवे, डॉ. संदीप बुटाला, शाम देशपांडे आदी उपस्थित होते.

या वेळी मंत्री पाटील म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 ला संविधानाचा मसुदा लोकसभेत सादर केला. त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी तो स्वीकारला गेला. त्यामुळे डॉ. आंबेडकर यांनी ज्या दिवशी हा मसुदा लोकसभेत सादर केला; तो दिवस पंतप्रधान मोदी यांनी संविधान दिवस म्हणून जाहीर केला. या दिवशी देशभरात संविधानाचं पूजन केलं जातं. संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं जातं. डॉ. बाबासाहेबांचा असा सन्मान काँग्रेसने कधीही केला नाही. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून अनेकवेळा घटनेत दुरुस्ती झाली. काँग्रेसने घटनेच्या मूळ गाभ्यालाच बोट लावले.

इंदिरा गांधी यांनी स्वत:चं पद टिकवण्यासाठी घटना दुरुस्ती केली. तसेच, वेळोवेळी संविधानातील कलमांचा गैरवापर करून राज्य सरकारे बरखास्त केली. दुसरीकडे नरेंद्र मोदीजींनी गरिबांना नोकरीमध्ये 10 टक्के आरक्षण मिळवून दिलं. तसेच, महिलांना 33 टक्के आरक्षण दिले असेही पाटील म्हणाले. रिपाइं आठवले गटाचे नेते वाडेकर म्हणाले, संविधान बदलाचा खोटा प्रचार करून काँग्रेस त्याचे भांडवल करत आहेत, तर ते बरोबर नाही. संविधान धोक्यात नाही, तुम्ही धोक्यात आहात. इंदू मिलसाठी जागा पंतप्रधान मोदींनी दिली. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी हेच संविधान रक्षक आहेत, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

हेही वाचा

Back to top button