सांगली : वैधमापनमधील ‘वजना’मुळे वाढले मापात पाप | पुढारी

सांगली : वैधमापनमधील ‘वजना’मुळे वाढले मापात पाप

सांगली; संजय खंबाळे :  दूध, दुग्धजन्य पदार्थ, किराणा, भाजी, फळे, पेट्रोल, डिझेल, गॅस अशा विविध गोष्टींच्या विक्रीत अनेक ठिकाणी बिनधास्तपणे ‘मापात पाप’ केले जात असल्याची चर्चा आहे. दिवसाढवळ्या ग्राहकांना लुटीचा धंदा सुरू असताना सर्व काही आलबेल असल्याचा ‘अर्थ’ काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोकांची फसवणूक थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांनी वैधमापन विभागाच्या कामकाजाचीच तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.

पॅकबंद वस्तूवर वैधमापनशास्त्र अधिनियम व नियमांतर्गत काही नियमावली ठरविण्यात आली आहे. विक्री होणार्‍या वस्तूंचे वजन, एमआरपी, उत्पादक, उत्पादनाचा महिना, ई-मेल, पत्ता, आयातदाराचे नाव, ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी दूरध्वनी क्रमांक अशा विविध गोष्टी लिहिणे बंधनकारक आहे. याची अंमलबजावणी होते की नाही, याची पडताळणी करण्याची जबाबदारी वजनमापे नियंत्रण विभाग (वैधमापन) विभागावर असते. मात्र हा विभाग या त्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतो.

धाडी टाकून तपासणी हवी

दूध, किराणा, भाजी, फळे, पेट्रोल, डिझेल, गॅस अशा बहुसंख्य वस्तूंची वजन आणि माफ यांचे सातत्याने तपासणी होणे आवश्यक आहे. मात्र ठराविक कालावधीत तपासणी केली जाते. याचा गैरफायदा घेऊन तपासणीवेळी नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाते. त्यानंतर सर्व ‘अ‍ॅडजेस्ट’ करून बिनधास्तपणे अनेक ठिकाणी दुकानदार, व्यावसायिक ‘काटामारी’ करून ग्राहकांची फसवणूक करीत आहेत, अशा तक्रारी येत आहेत. तसेच तपासणीसाठी येणार असल्याची माहिती यंत्रणेतील काहीजण संबंधितांना अगोदर देतात. त्यामुळे तपासणीत काही आढळत नाही, असे बोलले जाते. त्यामुळे वेळोवेळी धाडी टाकून नियमांबाबत खातरजमा करणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात यंदा गळीत हंमाम सुरू झाला आहे. मात्र सुरुवातीपासूनच काही कारखान्यांनी ‘काटामारी’ करून शेतकर्‍यांना पुन्हा लुटत आहेत. याबाबत शेतकरी संघटना गप्प बसल्याने वेगवेगळे ‘अर्थ’ काढले जात आहेत. काही संघटनांकडून दरवेळी आंदोलनाची स्टंटबाजी केली जाते. मात्र शेवटपर्यंत कोणी लढा सुरू ठेवत नाही. त्यामुळे वजनमापन विभाग यांच्या आंदोलनाची दखल घेत नाही.
महापूर, कोरोना, महागाई आणि अतिवृष्टीने अगोदरच सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. उदरनिर्वाह करताना अनेकांना नाकीनऊ येत आहे. मात्र घेत असलेल्या मालात त्यांची फसवणूक होत असल्याची अनेकांना कल्पनाही नाही. त्यामुळे एका बाजूला निर्सग मारतोय आणि दुसर्‍या बाजूला यंत्रणा लुटते, अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात धाडी टाकून काट्यांची तपासणी करण्याची मागणी होत आहे.

जिल्ह्यात 96 ठिकाणी कारवाई, 4 लाख रुपयांचा दंड

जिल्ह्यात वैधमापन विभागामार्फत वेळोवळी तपासणी करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. दि. 22 एप्रिल ते दि. 22 सप्टेंबर या कालावधीत वजन काटे आणि इतर नियमानुसार वस्तूंच्या पॅकबंदबाबत करण्यात आलेल्या तपासणीत एकूण 96 ठिकाणी गैरप्रकार आढळला आहे. यामध्ये 54 वजनकाट्यात त्रुटी आढळल्या तर 42 वस्तूंची विक्री नियमांनुसार होत नव्हती. त्यामुळे संबंधितांना एकूण 4 लाख 45 हजार 300 रुपयांचा दंड करण्यात आला आहे. तसेच सप्टेंबरअखेर घेण्यात येणार्‍या परवान्यातून 99 लाख 90 हजार 310 रुपये शुल्क मिळाला आहे.

यंत्रणा ‘अ‍ॅडजेस्ट’ :  साखर कारखान्यांकडून ‘काटामारी’

जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही उसाच्या प्रत्येक खेपेला काही कारखान्यांकडून दीड ते दोन टन ‘काटामारी’ होत असल्याच्या तक्रारी आहेत. जागृत शेतकरी खासगी काट्यावरून वजन करून ऊस पाठवतात, मात्र यंत्रणा मॅनेज असल्याने वाहन कारखान्यांत पोहोचण्यापूर्वीच वाहन क्रमांक, वजन कळवितात. त्यामुळे वजन समान येते. तसेच वजन करून आलेले वाहन जाणीवपूर्वक ताटकळत ठेवण्यात येते. बाहेरून वजन न करून आणण्याची तंबी दिली जाते. नेहेमीप्रमाणे उत्पादकांची यंदाही लुटमार सुरूच असून संतापची लाट उसळली आहे.

जिल्ह्यातील काही पेट्रोल पंपांत ‘मापात पाप’

जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर मापात पाप होत असल्याचे बोलले जाते. अनेक ठिकाणी शून्य रीडिंग न करताच ग्राहकांची लूट केली जात आहे. तसेच काही ठिकाणी इंधन सोडणार्‍या मशीनमध्ये चीप बसविण्यात आली आहे. त्यामुळे मीटर जोरात फिरते पण इंधन कमी येते, अशा तक्रारी आहेत. त्यामुळे पंपाची धाडी टाकून तपासणी करण्याची मागणी होत आहे.

अपवाद वगळता सर्वंच कारखाने उसाच्या खेपेत दीड ते दोन टनाची काटामारी करतात. उत्पादकांना लुबाडण्याचा धंदा बंद करावा. नियमाचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करावी. अन्यथा प्रशासन व कारखानदारांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करू.
– महेश खराडे,
जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी

जिल्ह्यात अनेक ठिकाणी वस्तूंच्या विक्रीत काटामारी सुरू आहे. वैधमापन विभागाबरोबर पोलिसांवर कारवाईची जबाबदारी आहे. मात्र म्हणावी अशी कारवाई होताना दिसत नाही. आपली फसवणूक होऊ नये, यासाठी ग्राहकांनी जागृत रहावे. कोठे गैरप्रकार सुरू असल्यास थेट वैधमापनकडे तक्रार करावी.
– डॉ. ज्ञानचंद्र पाटील
ग्राहक चळवळीचे अभ्यासक

विभागात कर्मचार्‍यांची कमतरता आहे. मात्र तरीही सातत्याने वजनकाटे व नियमानुसार वस्तूंची विक्री होते का, याची तपासणी केली जाते. गैरप्रकार करणार्‍यावर कारवाई सुरू आहे. कोठे गैरप्रकार सुरू असल्यास थेट आमच्याकडे तक्रार करावी. प्रत्येक तक्रारीची दखल घेऊन कारवाई करण्यात येईल.
– दत्तात्रय पवार, उपनियंत्रक, वैधमापन विभाग

Back to top button