सांगली : दिवाळीसाठी दुकाने सज्ज; बाजारपेठ गर्दीने फुलली | पुढारी

सांगली : दिवाळीसाठी दुकाने सज्ज; बाजारपेठ गर्दीने फुलली

सांगली;  पुढारी वृत्तसेवा :  दिवाळी अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीच्या स्वागतासाठी सांगलीत गणपतीपेठ, कापडपेठ, मारुती रोड नागरिकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. बाजारपेठा गजबजल्या आहेत. खास दिवाळीनिमित्त विक्रेत्यांनी ठिकठिकाणी मंडप घालून वस्तूंचे स्टॉल लावले आहेत. खास करून तयार फराळ, कपडे, आकाशकंदील, तयार किल्ले, विद्युत रोषणाईच्या माळा खरेदीसाठी गर्दी होत आहे. दरम्यान, दिवाळीसाठी सर्वत्र उत्साह आहे. दिवाळीत माहोल सजू लागला आहे.

गेली दोन वर्ष कोरोनामुळे दिवाळीचा आनंदोत्सव होऊ शकला नव्हता. त्यामुळे यंदा धूमधडाक्यात दिवाळी होत आहे. याची सर्वत्र जोरदार तयारी सुरू झाली आहे.

वर्षातील सर्वात मोठा सण अर्थात दिवाळीचा जल्लोष दि. 22 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. दिवाळीसाठी शहरात बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. भारती विद्यापीठ – कापडपेठ रस्त्यावर कपडे खरेदीसाठी ग्राहकांची सकाळपासूनच गर्दी होत आहे. या ठिकाणी रस्त्यावर मांडण्यात आलेल्या ऑफरच्या किमतीमधील कपड्यांच्या स्टॉलकडे ग्राहकांचा ओढा दिसत आहे. कापडपेठेमध्ये काही विक्रेत्यांनी खास दिवाळीसाठी सवलतीत कापड विक्रीचे स्टॉल उभारले आहेत. लहान मुलांच्या कपडे खरेदीसाठी खास विविध पद्धतीचे कपडे बाजारात आलेले आहेत. रंगीबेरंगी आकाशकंदील खरेदीसाठी ग्राहक आकर्षक होत आहेत. कागदी दिव्यांपासून ते चायना मेड दिवे उपलब्ध आहेत. रंगीबेरंगी पणत्यांचेही स्टॉल लागले आहेत.

तयार फराळाला प्राधान्य

दिवाळी म्हटली की, घराघरांमध्ये लाडू, चकली, करंजी अशा विविध फराळ तळण्याचे काम दिवाळीपूर्वी किमान आठ दिवस सुरू असायचे. मात्र, सध्या बाजारातील तयार फराळ खरेदीसाठी ग्राहकांचा ओढा वाढत आहे. त्यासाठी काही बचत गटांनी पुढाकार घेतलेला आहे. किलोपासून ते पाच किलोपर्यंत लाडू, चकली, करंजी करण्याच्या ऑर्डरी आल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

फटाके स्टॉलची उभारणी सुरू

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात येतात. बालगोपाळांचे खास आकर्षण बाजारपेठेत विविध प्रकारच्या फटाक्यांचे स्टॉल उभारणीची तयारी सुरू झाली आहे. यावेळी कमी आवाज आणि फक्त रोषणाई करणार्‍या फॅन्सी फटाक्यांना विक्रीसाठी ठेवणार असल्याची माहिती देण्यात
आली.

बाजारपेठेत बालचमूंची गर्दी

कपडे, किल्ल्यांवरील सैनिक, फटाके खरेदीसाठी पालकांसोबत बालचमूंची बाजारात गर्दी होत आहे. लहान मुलांना डोळ्यासमोर ठेवून विविध कार्टूनच्या आकारातील किल्ल्यावरील चित्रे बाजारात आली आहेत. कपड्यांवरही कॉर्टून फिल्मची चित्रे दिसत आहेत.

इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी बुकिंग

दिवाळीच्या पाडव्याचा मुहूर्त डोळ्यासमोर ठेवून अनेकांनी टी.व्ही., फ्रीज, वॉशिंग मशिन, संगणक, लॅपटॉप, मोबाईल खरेदीसाठी बुकिंग सुरू केले आहे. काही सवलतीच्या ऑफर्स दिल्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होत आहे. काहींनी सवलतीत वस्तूंची विक्री सुरू केली आहे.

Back to top button