Digital Banking Units : पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ७५ डिजिटल बँकिंग युनिट्सचे राष्ट्रार्पण

Digital Banking Units : पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ७५ डिजिटल बँकिंग युनिट्सचे राष्ट्रार्पण
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशातील 75 जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या 75 डिजिटल बँकिंग युनिट्सचे (Digital Banking Units) राष्ट्रार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. 'डिजिटल इंडिया' च्या सामर्थ्याचा देश आज पुन्हा एकदा साक्षीदार बनत असल्याचे प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केले.

देशातील सर्वसामान्य माणसाचे जीवन सोपे करण्याच्या दृष्टीने डिजिटल बँकिंग युनिट्स (Digital Banking Units)  हे एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचे सांगून मोदी पुढे म्हणाले की, डिजिटल बँकिंग युनिट्स ही अशी बँकिंग व्यवस्था आहे की, जी किमान डिजिटल पायाभूत सुविधांच्या माध्यमातून जास्तीत जास्त सेवा देण्याचे काम करू शकते. सामान्य मानवी जीवनाचा स्तर यामुळे सुधारणार आहे. सर्व प्रकारच्या व्यवस्थांमध्ये व्यापक सुधारणा करण्याचा केंद्र सरकारचा निर्धार आहे. त्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत केल्या जात आहेत. समाजात शेवटच्या स्तरावर असलेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. केंद्रातील भाजप सरकारने एकाचवेळी बँकिंग व्यवस्थेत सुधारणा करण्याचे, त्यात पारदर्शकता आणण्याचे आणि दुसरीकडे वित्तीय सर्वसमावेशकता आणण्याचे काम केलेले आहे.

देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत, प्रत्येक घरापर्यंत बँकिंग व्यवस्था पोहोचविण्याचा आमचा निर्धार आहे, असे सांगत ते म्हणाले की, आज देशातील 99 टक्के गावात पाच किलोमीटर परिघामध्ये बँकिंग आउटलेट अथवा बँकिंग मित्र उपलब्ध आहेत. आज देशातील प्रत्येक एक लाख लोकांमागे जितक्या बँक शाखा आहेत, त्याचे प्रमाण जर्मनी, चीन आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या देशांपेक्षाही जास्त आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आपल्या डिजिटल बँकिंग पायाभूत सुविधांची स्तुती केलेली आहे. याचे श्रेय गरीब, शेतकरी आणि मजूर वर्गाला जाते. कारण या लोकांनी डिजिटल तंत्रज्ञानाला आपलेसे करून जीवनाचा अविभाज्य भाग बनविले.

ज्यावेळी आम्ही जनधन खाती उघडण्याची मोहीम सुरू केली, त्यावेळी गरीब माणूस बँक खात्याचे काय करणार, असे सांगत खिल्ली उडविण्याचे काम काही लोकांनी केले. विषय म्हणजे बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांना यामागचे कोडे उलगडत नव्हते. पण बँक खात्यांची ताकत काय असते, हे आज संपूर्ण देश पाहत आहे. यूपीआय हे आपल्या प्रकारचे जगातले पहिले तंत्रज्ञान आहे. पारंपरिक देवाण-घेवाणीची जागा आता यूपीआयने घेतली आहे. आज ही प्रणाली एमएसएमई तसेच खाजगी संस्थांच्या विकासात मोलाची कामगिरी बजावत आहे.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news