सांगली : दिवाळीच्या फराळाला महागाईची फोडणी! | पुढारी

सांगली : दिवाळीच्या फराळाला महागाईची फोडणी!

सांगली; विवेक दाभोळे : दिवाळीच्या सणावर, फराळावर महागाईचे विरजण पडू लागले आहे. दिवाळीच्या फराळाला महागाईची फोडणी बसते आहे. यामुळे सामान्य मध्यवर्गीय आणि सातत्याने विविध नैसर्गिक संकटांचा सामना करत असलेल्या शेतकर्‍यांसाठी महागाईमुळे फराळाची चव कडवटच राहणार आहे.

दिवाळीच्या सणावरही महागाईचे सावट आहे. अगदी तयार फराळदेखील यातून सुटलेला नाही. मागील एक दोन वर्षाच्या तुलनेत पदार्थांच्या दरात पाच ते आठ टक्क्यांच्या घरात वाढ झाली आहे. डाळी, तूप, साखर अशा सर्व जिन्नस यांच्या किंमती वाढल्या आहेत. केवळ तेलाच्या दरात काहीसा उतार असल्याचा तेवढाच दिलासा राहिला आहे. दरम्यान, यामुळे फराळाच्या पदार्थांचे दर काही प्रमाणात वाढणार असल्याचे फराळ तयार करणार्‍यांकडून सांगण्यात येते.

आता गृहिणीवर्ग फराळाच्या तयारीला लागला आहे. मात्र फराळासाठी आवश्यक वस्तूंची दरवाढ होत आहे. केंद्र सरकारने किराणा मालावर जीवनावश्यक वस्तूंवर सरसकट जीएसटी लागू केल्याचे परिणाम आता जाणवू लागले आहेत. दही, तूप, लोण्यानंतर गूळ, पोह्यावरही जीएसटी लागू झाल्याने दगडी पोहे, जाड पोहे, भाजक्या पोह्याचे दर वाढले आहेत. पोह्यांचे दर पाच ते दहा रुपयांनी वाढले आहेत. गूळ, तूप शेंगदाणे, वेगवेगळ्या डाळींच्या भाववाढीची स्पर्धाही कायम असल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. यामुळे दिवाळीतील चिवडा, फराळदेखील महागणार आहे. पोह्यांचे दर, गुळाच्या किमती, शेंगदाणा, चणाडाळ, मूगडाळ महागली आहे. विशेष म्हणजे 25 किलोच्यावर वस्तू घेतल्या तर त्यावर जीएसटी नाही. 25 किलोच्या आतील वस्तू घेतल्या तर त्यावर जीएसटी लावला जात आहे. दिवाळीच्या फराळाला महागाईचा चटका बसला आहे. महागाईमुळे विविध जिन्नस महागले आहेत.

तयार फराळ महागला..

दिवाळीसाठीचे खास आकर्षण असलेला मोतीचूर लाडू 260 ते 275 रु. किलोेच्या घरात गेला आहे. तुपातील रवा लाडू 440 ते 450 रु. किलो, तुपातील बेसन लाडू 480 ते 485 रु. प्रतिकिलो., तुपातील डिंक लाडू 600 रु. किलो झाले आहेत. तळीव चिवडा 250 ते 260 रु. किलोच्या घरात गेला आहे. पातळ पोहे चिवडा 300 रु. किलो, भाजके पोहे चिवडा 260 रु. किलो, चकली (भाजणी) : 320 रु. किलो, शंकरपाळी गोड : 320 रु., तर तिखट शंकरपाळी प्रतिकिलो 320 रु. किलो., करंजी चाळीस नगाला 600 रु., खाजा 30 नग : 300 रु,. खारी बुंदी तसेच मसाला बुंदी 240 रु. किलो आहे.

फराळाचे पदार्थ महागले…

रवा, रवा नारळ, रवा बेसन, बेसन, चिवड्यासाठीचे पोहे, खारे शंकरपाळे, साधी शेव, लसूण शेवही महागली आहे. सरासरी सुक्या खोबर्‍याच्या सारणाची करंजी 25 ते 35 रु. प्रति नग तर अनारसे 25 ते 30 रु. नग असे सर्वसाधारणपणे किंमतीचे चित्र आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यात वाढ झाली आहे. प्रत्येक वर्षी महागाईमध्ये वाढ होते. जिन्नसांच्या किंमतीमध्ये चढ-उतार होतात. यंदा मात्र ही वाढ अधिक दाहक ठरू लागली आहे.
काटकसर करीत कसाबसा महिन्याचा खर्च भागविणार्‍या मध्यमवर्गीयांच्या खिशावर फराळ तसेच फराळ तयार करण्यासाठीचे पदार्थ विकत घेताना अधिकच ताण येणार आहे.

फराळाचे जिन्नसही महागले!

दिवाळीसाठीचे पदार्थ घरीच तयार करण्याकडे अनेकांचा कल राहतो. अगदी अनेकांच्या घरात पिढ्यान्पिढ्या फराळाचे पदार्थ घरातच तयार केले जातात. मात्र आता घरात पदार्थ तयार करणे देखील महाग झालेले पदार्थ विकत घ्यावे लागणार आहेत. यामुळे पदार्थाची चव काहीशी कडवट राहणार आहे.
जिन्नसचे दर प्रतिकिलो (रू.) पुढीलप्रमाणे : साधी शेव : 240, तिखट शेव : 240, लसूण शेव : 260, कडबोळी : 260, म्हैसूरपाक : 240, बाकरवडी : 240, अनारसे : 50 नगांसाठी : 600 ते 550, चिरोटे 200 ग्रॅम : 150, लाडूच्या कळ्या : 260.

बचत गटांत ‘फीलगुड’…

दिवाळी आणि फराळाचे नाते अतूट आहे. आता घराघरांमध्ये फराळ बनविण्याची, त्यासाठीचे पदार्थ खरेदी करण्याची लगबग सुरू झाली आहे. याचवेळी बाजारात तयार फराळालादेखील मागणी आहे. यातूनच ग्रामीण आणि शहरी भागात देखील महिला बचत गटदेखील सरसावले आहेत. दिवाळीतील बहुतेक फराळाचे पदार्थ घरी बनवले जातात. मात्र आजच्या वेगवान आणि आधुनिक जीवनात नोकरदार महिलावर्गाला घरी फराळ बनवणे शक्य होत नाही. यामुळे बाजारात उपलब्ध तयार पदार्थांनादेखील चांगली मागणी असते. याच संधीचा फायदा घेण्यासाठी बचत गटदेखील तयारीस लागले आहेत. ग्राहकांना बाजारातील फराळाबरोबरच घरगुती स्वाद देणार्‍या फराळाचा पर्याय म्हणून महिला बचत गटांनी पुढाकार घेतला आहे. त्याचप्रमाणे शिवाय हे पदार्थ दर्जेदार आणि दुकानांमधील पदार्थापेक्षा स्वस्त असल्याचे दिसते.

Back to top button