सांगली : टक्केवारीसाठी अडू लागल्या फाईली | पुढारी

सांगली : टक्केवारीसाठी अडू लागल्या फाईली

सांगली : पुढारी वृत्तसेवा :  महापालिकेत टक्केवारीसाठी फाईली अडू लागल्यावरून संताप व्यक्त होऊ लागला आहे. फाईल पेंडन्सी, शेरे, फाईलींची या विभागाकडून त्या विभागाकडे टोलवाटोलव याबाबत तक्रार वाढू लागल्या आहेत. नगरसेवकांमध्येही यावरून असंतोष आहे. नगरसेवक आणि अधिकारी / कर्मचारी यांच्यात खटके उडू लागले आहेत. आयुक्त सुनील पवार यांनी संबंधित विभागांची झाडाझडती घ्यावी, अशी मागणी होत आहे.

नगररचना विभागाच्या कारनाम्यांवरून महापालिकेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. आयुक्त पवार यांनी तक्रारी गांभिर्याने घेतल्या आहेत. त्यामुळे संबंधितांची पळापळ सुरू झाली आहे. सारवासारव होत आहे. महापालिकेतील टक्केवारीचा विषयही यानिमित्ताने पुन्हा चर्चेेला आला आहे. महापालिकेत कामांच्या फाईलचा प्रवास हा विषयच वादग्रस्त आहे. टेबलवर फाईल आली कधी आणि मार्गस्थ झाली कधी, संबंधित फाईल टेबलवर किती दिवस राहिली, याबाबतच्या नोंदीच होत नाहीत आणि झाल्याच तर त्या सोईने टाकलेल्या असतात, अशी तक्रार आहे. फाईलवर वजन पडल्याशिवाय फाईल जागची हालत नाही, असा तक्रारींचा सूर आहे. फाईलवर स्वाक्षरीसाठी पाठपुरावा केल्यास अनेक त्रुटी काढून ठेकेदारांना जेरीस आणले जात असल्याच्या तक्रारी आहेत. असंतोष वाढल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी वाढण्याचे संकेत मिळत आहेत.

टक्केवारीत मुरते 20 ते 32 टक्के रक्कम

एखादे काम मंजूर होऊन ते कामाची रक्कम मिळेपर्यंत फाईल अनेक टेबलांवरून जाते. फाईल पुढे सरकवण्यासाठी ठेकेदाराला प्रत्यक्ष लक्ष घालावे लागते. काम शासन निधी अथवा डीपीसीतील असेल तर कामाची रक्कम निघेपर्यंत 30 ते 32 टक्के रक्कम टक्केवारीत जात आहे. काम जर महापालिका निधीतील असेल तर 20 ते 22 टक्के रक्कम टक्केवारीत मुरत आहे. एवढी मोठी रक्कम टक्केवारीत जात असल्याचे कामांचा दर्जा कसा राहणार, असा प्रश्न ठेकेदारांकडून उपस्थित केला जात आहे. टक्केवारीवर अकुंश ठेवला तरच कामांचा दर्जा सुधारणार आहे.

महापालिकेतील बोकाळलेल्या टक्केवारीची आयुक्त सुनील पवार यांनी गंभीर दखल घ्यावी. अर्थपूर्ण अपेक्षेने फाईल पेंडिंग राहू नये, यासाठी फाईलींच्या प्रवासावर नजर ठेवावी, अशी मागणी होत आहे. फाईलवर स्वाक्षरी झाल्यानंतर आवक तारीख टाकण्याचा प्रघात असल्याच्या तक्रारी आहेत. शहानिशा करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

काही मानधनी कर्मचारी पगारापुरते?

महापालिकेकडे मानधन तत्त्वावरील कर्मचारी संख्याही बरीच आहे. मानधनावरील काही कर्मचारी कामाकडे न फिरकता पगार खिशात घालतात, अशा तक्रारी आहेत. हे सर्व संगनमताने सुरू असल्याचा आरोप होत आहे. आयुक्त पवार यांनी या तक्रारी, आरोपांचीही शहानिशा करणे गरजेचे आहे. महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक स्वच्छतागृहे नेहमीच अस्वच्छ असतात. मग ही स्वच्छतागृहे स्वच्छ करण्यासाठी संबंधित कर्मचार्‍यांना दिले जाणारे साहित्य जाते कुठे, असा प्रश्न एका नगरसेवकांनी नुकताच केला होता. हा प्रकारही आयुक्तांनी गांभिर्याने घ्यावा, अशी मागणी होत आहे.

Back to top button