सांगली : जिल्ह्यात लम्पीची 109 जनावरांना लागण; तीन जनावरांचा मृत्यू | पुढारी

सांगली : जिल्ह्यात लम्पीची 109 जनावरांना लागण; तीन जनावरांचा मृत्यू

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात रविवारी नव्याने 16 जनावरांना लम्पी स्कीनची बाधा झाली आहे. आत्तापर्यंत एकूण 109 जनावरे संसर्गाच्या विळख्यात अडकली आहेत. तर वासरू, गाय आणि बैल अशा तीन जनावरांचा लम्पी स्कीनच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे. संसर्गाची लागण होऊन मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत असल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

जिल्ह्यात दिवसेंदिवस संसर्गाचा आलेख वाढत आहे. जिल्ह्यात लम्पीचा संसर्ग झालेली गावे पुढील प्रमाणे ः शेखरवाडी 41, चिकुर्डे 14, इटकरे 7, कि. मच्छिंद्रगड 1, भडकंबे 5, सावंतपूर 1, भिलवडी स्टेशन 6, मोराळे 2, सुभाषनगर 2, एरंडोली 2, मल्लेवाडी 1, इस्लामपूर 7, बसरगी 1, रेवनाळ 3, समडोळी 2, पुजारवाडी 1, राजेवाडी 1, कुरुंदवाडी 1, सांगली 1, सावळी 3, मोजे डिग्रज 1, विटा 1, अंकलखोप 1, आरग 1, तोंडोली 1, बागणी 1 अशा एकूण 109 जनावरांना लम्पीची लागण झाली आहे.लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनावर कडून लसीकरण करण्यात येत आहे आत्तापर्यंत सुमारे 30000 जनावरांना लस टोचण्यात आली आहे. रविवारी ही जिल्ह्यात लसीकरण सुरू होत.

राज्यातील जनावरांमध्ये लम्पी चर्मरोग हा साथ रोग आढळून आला आहे. तसेच हा जलदगतीने पसरणारा अनुसूचित रोग असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातही या आजाराचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यामुळे या आजाराचा प्रतिबंध व परिणामकारक नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 नुसार जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी सांगली यांची इन्सिडेंट कमांडर म्हणून नियुक्ती केली आहे.

खोतवाडीत लम्पीने घेतला बैलाचा बळी

बिसूर : मिरज तालुक्यातील कावजी खोतवाडी येथील बैलास आठ दिवसांपूर्वीच लम्पी स्कीनची लागण झाली होती. पशुसंवर्धन विभागामार्फत त्यांच्यावर उपचार सुरू होते. दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन बैलाच्या तब्येतीची विचारपूस केली होती. मात्र रविवारी या बैलाचा मृत्यू झाला आहे. काही दिवसापूर्वीच या बैलाची खरेदी करण्यात आली होती. बैलाच्या दुर्दैवी मृत्यने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

Back to top button