धुळे : पुढारी वृत्तसेवा- धुळे लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या दोन वेळ खासदार राहणाऱ्या आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्रीपद भूषवणारे डॉ. सुभाष भामरे यांचा पराभव करणाऱ्या काँग्रेसच्या विद्यमान खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचा राजकीय प्रवास नगरसेवक ते राज्याच्या मंत्री आणि आता खासदार असा राहिला आहे. काँग्रेसच्या निष्ठावान म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
काँग्रेसच्या एकनिष्ठ म्हणून ओळख असणाऱ्या डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या गळ्यात मतदारांनी धुळे लोकसभा मतदार संघाच्या खासदारकीची माळ टाकली आहे. काँग्रेस समवेत प्रामाणिक राहिल्याने त्यांना पुन्हा केंद्रात धुळे लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी यापूर्वी अनेक महत्त्वपूर्ण पदांवर काम केलेले आहे. त्यांचे माहेर नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील पिंपळगाव वाखरी येथील आहे. तर सासर हे मालेगाव तालुक्यातील सोनज येथील आहे. धुळे शहरात देखील त्यांचे अनेक नातेवाईक राहतात. तर बागलानमध्ये देखील त्यांचा नातेवाईकांचा मोठा गोतावळा आहे. काँग्रेसने त्यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीकडून त्यांना बाहेरचा उमेदवार म्हणून हिणवले गेले. विशेष म्हणजे काँग्रेसच्या एका गटाकडून देखील त्यांच्यावर तसाच आरोप झाला. पण खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी या आरोपांना समर्थ पणे उत्तर दिले. आपला धुळे लोकसभेच्या मालेगाव तालुक्याशी संबंध असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने या आरोपाचा धुराळा खाली बसला.
खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांची नाशिक शहरातील काँग्रेसच्या नगरसेविका पदापासून त्यांची महत्त्वाची राजकीय कारकीर्द सुरू झाली. तेथून त्यांनी महापौर, काँग्रेसच्या शहराध्यक्ष, आमदार ते राज्यमंत्रीपदापर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास सुरू ठेवला. नाशिकमध्ये 1999 मध्ये त्या महापौर पदी नियुक्त झाल्या. या कालावधीत त्यांनी अनेक विकासाच्या योजना नाशिक मध्ये राबवल्या. शासनाने महापौरपदाची कारकीर्द अडीच वर्षांची केल्याने केली. त्यामुळे त्यांना या कालावधीतील नाशिकचे महापौर पद भूषवता आले.
याच काळात त्यांनी केलेल्या विकास कामांमुळे त्यांची वाटचाल आमदारकीच्या पदापर्यंत होत गेली. वर्ष 2004 मध्ये त्यांनी भाजपाचे माजी मंत्री डॉक्टर दौलतराव आहेर या दिग्गज नेत्याचा पराभव करून आमदारकी मिळवली. त्यांच्या रूपाने तब्बल 3 दशकानंतर नाशिक शहरात काँग्रेसने आमदारकी मिळवली होती. त्यामुळेच तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात डॉक्टर बच्छाव यांना आरोग्य राज्यमंत्री पद ही भूषवता आले. या कालावधीत त्यांनी धुळ्याचे पालकमंत्री पद सांभाळले. पालकमंत्री पदावर काम करीत असताना त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्याबरोबरच विकासाच्या कामांकडे देखील लक्ष दिले. विशेष म्हणजे त्यांच्या काळात धुळ्याच्या काँग्रेस भा्वनात पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची रेलचेल होती. त्यामुळेच त्यांनी खासदारकी मिळवल्याबरोबर सर्वात आधी काँग्रेस भवन गाठून त्याच ठिकाणी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून सत्कार स्वीकारला. यावरून त्यांची पक्षाबद्दलची निष्ठा स्पष्ट दिसते.
खासदार होण्यापूर्वी त्यांच्याकडे काँग्रेसचे धुळे जिल्ह्याचे प्रभारी पद होते. तर पक्षाचे राज्याचे सरचिटणीस पद देखील त्यांच्याकडे होते. राज्यातील अनेक पक्षांमध्ये पक्षांतर होत असताना देखील त्यांनी धुळे जिल्ह्या समवेत असलेली आपली राजकीय नाळ कधीच तुटू दिली नाही. या जिल्ह्यातील राफेलचे आंदोलन असो किंवा दुष्काळाच्या विरोधात निघणारे मोर्चे आणि निदर्शने असो ,यात प्रभारी म्हणून डॉक्टर शोभा बच्छाव यांनी काँग्रेसची बाजू भक्कमपणे मांडण्याचे काम आणि काँग्रेसचे विचार कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरूच ठेवले होते. त्यामुळेच काँग्रेसने त्यांच्या या निष्ठेची दखल घेऊन त्यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत धुळे लोकसभेच्या जागेवरून प्रतिनिधित्व करण्यासाठीची संधी दिली. पालकमंत्री पदाच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समविचारी पक्षाच्या नेत्यांबरोबर जोडलेले संबंध त्यांना आता प्रचारात कामी आले. त्यांना प्रचारासाठी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारापेक्षा कमी कालावधी मिळाला. तरीही त्यांनी संधीचे सोने करून दाखवले.
हेही वाचा-