पलूस: मोराळेत ‘लम्पी’चा पहिला बळी; वासराचा मृत्यू | पुढारी

पलूस: मोराळेत ‘लम्पी’चा पहिला बळी; वासराचा मृत्यू

पलूस; पुढारी वृत्तसेवा: लम्पिस्किन आजाराची लागण झाल्याने मोराळे (ता. पलूस) येथील सहा महिन्यांच्या खिलार खोंड वासराचा मृत्यू झाल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एस. कदम यांनी दिली. हा जिल्ह्यातील पहिलाच बळी असल्याने पशुपालकांमध्ये चिंता वाढली आहे.

सध्या पलूस तालुक्यात लम्पिस्किन लागण झालेली सहा जनावरे आहेत. त्यापैकी मोराळे येथील रोहित पाटील यांच्या वासराला लागण झाली होती. दि. 10 रोजी अधिकार्‍यांनी तपासणी केली असता वासराच्या अंगावर गाठी, ताप येणे, नाकातून व तोंडातून लाळ गळणे अशी लक्षणे दिसून आल्याने त्यांनी तत्काळ त्याचे नमुने पुणे येथील प्रयोग शाळेत पाठवले. त्याचा अहवाल 15 सप्टेंबर गुरुवारी सकाळी आल्यानंतर डॉ. आर. एस. कदम हे तपासणीसाठी गेले असता त्याचा मृत्यू झाला होता.

लसीकरण करून घेण्याचे आवाहन

15 सप्टेंबर अखेर तालुक्यात लंपी चर्मरोग आजाराचे सावंतपूर मध्ये संकरीत गाय, भिलवडी स्टेशन- संकरीत गाय, वसगडे- खिलार गाय, मोराळे- खिलार खोंड, माळवाडी- संकरीत गाय व खिलार खोंड अशा एकूण सहा जनावरांना लंपी चर्मरोग आजाराची लक्षणे आढळून आली आहेत.

सदर चार जनावरांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्या जनावरांना शासकीय पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून औषध उपचार सुरू आहेत.पशुपालकांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावे व रोग प्रतिबंध होण्यासाठी गोठ्यात सायंकाळी सहा ते आठ या वेळेत धूर किंवा कीटकनाशकची फवारणी करून घ्यावी, असे आवाहन डॉ. आर. एस. कदम यांनी केले आहे.

Back to top button