सांगली : शाखा अभियंता मकानदारला अटक | पुढारी

सांगली : शाखा अभियंता मकानदारला अटक

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  बांधकाम परवाना देण्यासाठी 40 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी कुपवाड शहर प्रभाग समिती तीनमधील नगररचना विभागाचा शाखा अभियंता अल्ताफ मकबूल उर्फ महमंद मकानदार (वय 44) याला बुधवारी रात्री अटक करण्यात आली. त्याच्या मिरजेतील घरावर व कार्यालयावर बुधवारी छापा टाकण्यात आला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुजय घाटगे यांच्या पथकाने एकाचवेळी छापा टाकून दोन तास घर व कार्यालयाची झडती घेतली. यामध्ये काही महत्वाची कागदपत्रे हाती लागल्याने ती ताब्यात घेतली असल्याचे घाटगे यांनी सांगितले.दरम्यान, मकानदारला न्याायालयाने चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्याच्यावर करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल लाचलुचपत विभागाने आयुक्त सुनील पवार यांना सादर केला असल्याचे सांगण्यात आले.

तक्रारदार मिरज परिसरातील आहेत. ते एका कंपनीत नोकरी करतात. त्यांनी कुपवाड महापालिका क्षेत्रातील दोन प्लॉटचे एकत्रिकरण व त्या प्लॉटवर बांधकाम परवाना मिळावा, कुपवाड महापालिकेच्या नगररचना विभागात अर्ज दोन फाईल सादर केला होता. बांधकाम परवाना देण्यासाठी मकानदार याने 45 हजार रुपये रुपये लाचेची मागणी केली होती. चर्चेअंती 40 हजार रुपये देण्याचे ठरले. दरम्यान, तक्रारदार यांनी मकानदार यांच्याविरोधात तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. लाचलुचपत विभागाने मंगळवारी मकानदारला पकडण्यासाठी सापळा लावला. पण त्याला तक्रारदार यांच्यावर शंका आल्याने त्याने लाचेची रक्कम स्वीकारली नाही. परंतु लाचेची मागणी केल्याप्रकरणी त्याच्याविरूद्ध कुपवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात त्याला बुधवारी अटक केली. दुपारी त्याला जिल्हा न्यायालयात उभे करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. मिरजेत त्याच्या घरावरही छापा टाकला. घराजवळच त्याचे कार्यालय आहे. तिथेही छापा टाकून दोन तास झडती घेतली. महत्वाची कागदपत्रे हाती लागल्याने ती ताब्यात घेण्यात आली आहेत.

दहा महिन्यांपासून पथक मागावर

दि. 10 नोव्हेंबर 2021 रोजी मकानदार याने तक्रारदाराकडे प्रथम 45 हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर पुन्हा दि. 10 फेब्रुवारी 2022 रोजी 40 हजार रुपये देण्याचे ठरले. त्याचवेळी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून या विभागाचे पथक त्याच्या मागावर होते. पण तो सापळ्यात सापडला नाही. मंगळवारीही तो सावध झाल्याने सापळ्यात अडकलाच नाही.

Back to top button