सांगली : हल्लेखोर मोकाट; पोलिस हतबल | पुढारी

सांगली : हल्लेखोर मोकाट; पोलिस हतबल

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  येथील बांधकाम व्यावसायिक माणिकराव पाटील यांच्या खुनाचे गूढ उकलण्यासाठी कोणतेही धागेदोरे हाती लागत नसल्याने पोलिस यंत्रणा हतबल झाली असल्याचे चित्र आहे. दरम्यान, संशयितांची धरपकड सुरूच आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणची तीन पथके तपासासाठी बाहेर आहेत.

दि. 13 ऑगस्टरोजी पाटील यांना तुंग (ता. मिरज) येथे प्लॉट दाखविण्याचे आमिष दाखवून बोलावून घेतले. तेथील मिणचे मळ्यापासून पाटील यांचे अपहरण करण्यात आले होते. 17 ऑगस्टरोजी पाटील यांचा (कवठेपिरान,ता. मिरज) वारणा नदीमध्ये मृतदेह आढळून आला होता. त्यांचे दोन्ही हात बांधलेले होते. गेल्या दहा दिवसापासून पोलिस यंत्रणा तपास करीत आहे. पण हाती कोणतीही ठोस माहिती लागलेली नाही.

पाटील यांचे त्यांच्याच कारमधून अपहरण करण्यात आले. तेथून कवठेपिरान रस्त्यावरील कारंदवाडी गावच्या दिशेने पाटील यांना नेण्यात आले. तेथून ही कार पुन्हा कवठेपिरान-दुधगाव रस्त्यावरून गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे. कवठेपिरानमधून बाहेर पडल्यानंतर कारच्यामागे ही मोपेड दिसून येते. यावरून हल्लेखोर हे कवठेपिरान, दुधगाव, तुंग व कारंदवाडी परिसरातील असण्याची शक्यता असल्याचे पोलिसांचा अंदाज आहे.

कवठेपिरान येथील आणखी काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. आतापर्यंत जवळपास दोनशेहून अधिक जणांची चौकशी झालेली आहे. सध्या तांत्रिक मुद्यावरच तपासाची मदार ठेवण्यात आली आहे. जी व्यक्ती प्लॉट दाखविण्याचे आमिष दाखविण्यासाठी फोन करीत होती, ती कोण आहे, याविषयी माहिती देण्यास पोलिस टाळाटाळ करीत आहेत. खुनामागे गंभीर कारण असू शकते, असा पोलिसांना संशय आहे. तपास हा सुरूच असून लवकरच छडा लागेल, असा पोलिस अजूनही दावा करीत आहेत.

Back to top button