

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेने आणि वृक्षमित्र धो. म. मोहिते, मुकुंदराव किर्लोस्कर यांच्या संकल्पनेतून साकार झालेले भारतातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य म्हणून सागरेश्वरचा उल्लेख होतो. सन 1972 च्या दुष्काळात या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. हे अभयारण्य पर्यटक, ट्रेकिंग करणार्यांसाठी चांगले ठिकाण आहे.
कडेगाव, पलूस आणि वाळवा या तालुक्याच्या सीमावर्ती भागातील सह्याद्री डोंगररांगेत हे अभयारण्य आहे. त्याचे 10.84 चौ.किमी क्षेत्रफळ आहे. या परिसरात डोंगर, दर्या-खोर्यात अनेक सदाहरित वृक्षासह अनेक प्रकारची झाडे-झुडपे आणि औषधी वनस्पती आढळतात. यामध्ये साग, वड, पिंपळ, लिंब, चेरी, औदुंबर, खैर, पळस, निलगीरी यासह अनेक वनऔषधींचा समावेश आहे.
अभयारण्यात 155 प्रकारचे विविध पक्षी आढळतात. मागील काही वर्षांपासून विदेशी पक्ष्यांचा वावरही दिसून आला आहे. यात रोजीस्टरलाईन, कॉमन चिपचॉप, ब्लीचचा शरवर वट्यार, ग्रेब अॅक्टे, पॅलिड हेरियल, कॉमन सॅड पायपर, ब्लॅक विंटले स्टील्ट, कॉमन केस्ट्रल, ग्रीन सॅड पायपल, अॅसिड रंगो आणि ब्लॅक रॅडस्ट्रायटल या विदेशी पक्ष्यांचा समावेश आहे.
अभयारण्य हरणांचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. अभयारण्यात चितळ, सांबर, काळवीट आदी प्रकारची हरणे जास्त आढळतात. अभयारण्यात या प्राण्यांची घनताही जास्त आहे. आता अभयारण्यात बिबट्यांसह गव्यांचाही वावर आढळला आहे. अरण्यात ससे, कोल्हे, रानडुक्कर, साळिंदर, लांडगे, तरस, घोरपड, साप आढळतात.
रनशूळ पॉईंट, 3500 फूट उंच कड्याच्या कपारीवर असणारा महान गुंड, फेटा उडवी पॉईंट, किर्लोस्कर पॉईंट, मृग विहार, तरस गुहा, छत्री बंगला, लिंगेश्वर मंदिर यांचा समावेश होतो. किर्लोस्कर पॉईंट येथून कृष्णा नदीचे विहंगम दृश्य दिसते.
अभयारण्यात पर्यटकांना राहण्याची उत्तम सोय आहे. यासाठी विश्रामगृह व अत्याधुनिक बांबू लॉगट आहेत.
रेल्वेने : ताकारी स्टेशनपासून 5 किमी
बसने : कराडहून 33 किमी सांगलीहून : 55 किमी इस्लामपूरहून : 21 किमी