सांगली : टेंभूच्या बंदिस्त पाईपलाईनमुळे शेकडो एकर शेती पडीक राहण्याची भीती | पुढारी

सांगली : टेंभूच्या बंदिस्त पाईपलाईनमुळे शेकडो एकर शेती पडीक राहण्याची भीती

विटा; पुढारी वृत्तसेवा : टेंभू योजनेच्या बंदिस्त पाईप लाईन शेतातून गेल्याने शेत जमिनींचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे या बंदिस्त पाईपलाईन योजनांतून पाणी जाण्यापूर्वी त्याचे तोटे अनुभवाला येऊ लागले आहेत असा सूर लोकांमधून ऐकू येऊ लागला आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष न दिल्यास यापुढे शेत जमिनींमध्ये पाईप घालू देणार नाही अशी भूमिका घेण्याच्या तयारीत शेतकरी दिसत आहेत.

उघड्या पाटांतून किंवा कालव्यातून पाणी देण्याच्या योजनांना मागच्या वेळी २०१४ ते २०१९ या दरम्यान राज्यात सत्तेत आलेल्या भाजप – शिवसेना सरकारने ब्रेक दिला आणि टेंभू योजनेच्या उर्वरित भागाला बंदिस्त पाईपलाईन्सद्वारे पाणी दिले जाईल अशी भूमिका घेतली. आणि तसे कामही सुरु केले. परंतु, चार- चारवेळा आराखडे बदलून, नकाशे बदलून सुद्धा टेंभू योजना पूर्णत्वास जायचे नाव घ्यायला तयार नाही. अद्याप एकीकडे टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याला मंजूरी मिळालेली नसताना दुसरीकडे ज्या ठिकाणी टेंभूच्या लाभक्षेत्राला टेंभू योजनेचे पाणी बंदिस्त पाईप लाईनमधून द्यायचे नियोजन आहे. त्या ठिकाणी सुरु असलेल्या कामांच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. बेणापूर परिसरातील एका शेतात चक्क बंदिस्त पाईपलाईन फुटल्याने शेती पिकांचे नुकसान झाल्याची घटना ताजी असतानाच आता ज्या शेतात पाईप पुरल्या जात आहेत त्या ठिकाणच्या जमिनी कंत्राटदारांनी समतल करून न दिल्याने शेकडो एकर शेती पडीक राहण्याची भीती निर्माण झाली आहे.

खानापूरसह आटपाडी तालुक्यात असे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. बलवडी (खानापूर) येथील बालाजी मोहन गायकवाड यांच्या गट नंबर ११२९ आणि ११४१ यांच्या शेत जमिनीतून बलवडी (खानापूर) ते भिवघाट आणि बलवडी (खानापूर) ते चिंचाळे (ता. आटपाडी) या दोन बंदिस्त पाइपलाईन्स गेल्या आहेत. यात गट नंबर ११२९ मधून बलवडी (खानापूर) ते भिवघाट ही बंदिस्त पाईप लाईन १५ फूट जमिनीखालून गेली आहे. या ठिकाणी एकूण २५० फूट अंतराच्या जमिनीचे नुकसान झाले आहे. तसेच गट नंबर ११४१ मधून बलवडी (खानापूर) ते चिंचाळे (ता.आटपाडी) ही बंदिस्त पाईप लाईन १५ फूट जमिनीखालून गेल्याने या ठिकाणी एकूण ६५० ते ७०० फूटाची जमीन खराब झाली आहे. या दोन्ही ठिकाणी जमिनी खालचे मोठे- मोठे दगड २० ते २५ फूट आडवे टाकल्याने जमीन अक्षरश: वाया गेल्याचे चित्र आहे.

सध्या राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार तसेच जलबिरादरी संस्था आणि अन्य सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने अग्रणी नदीच्या पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. शिवाय टेंभू योजनेच्या पाचव्या टप्प्यातून अग्रणी नदी आणि परिसरातील ओढे, नाले, विहिरी, कूपनलिकांना बऱ्यापैकी पाणी आले आहे. परिणामी, इंच जमिनीला चांगलाच भाव आला आहे. इथले कष्टाळू शेतकरी प्रचंड मेहनतीने शेत बागायत फुलवत असताना बंदिस्त पाईप लाईन्ससारखी योजना राबविताना शासनाच्या दुर्लक्षामुळे शेकडो एकर शेती पडीक राहण्याची भीती निर्माण झाली आहे. परिणामी, टेंभू योजनेच्या बंदिस्त पाईपलाईन योजनेचे फायदे दिसण्यापूर्वी त्याचे तोटे अनुभवाला येऊ लागले आहेत अशी उपरोधिक चर्चा सुरु झाल्या आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button