कोयना धरणातून ३२ हजार विसर्ग सुरू | पुढारी

कोयना धरणातून ३२ हजार विसर्ग सुरू

सांगली; पुढारी वृत्तसेवा : कोयना पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे. धरणात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे कोयना धरणातून 32 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पातळीत रविवारी झपाट्याने वाढ होण्याचा अंदाज आहे.

गेल्या आठवड्यात सांगलीसह धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे कोयना, चांदोली, कण्हेर धरणात पाण्याची आवक वाढली होती. त्यामुळे विसर्ग वाढवण्यात आला होता. सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी सुमारे 28 फूट 9 इंचापर्यंत गेली होती.

सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यात शनिवारी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत पडलेला पाऊस मिलिमीटर असा ः तासगाव ः 0.5, शिराळा ः 6, इस्लामपूर ः 1.8, पलूस ः 0.8, सांगली ः 3, मिरज ः 0.5, विटा 0, कवठेमहांकाळ ः 0.5, जत ः 1.5, कडेगाव ः 2.

कोयना धरणात 23 हजार 814 क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. तसेच चांदोलीत 4 हजार 443, धोम 2 हजार 812, कण्हेर 2 हजार 977 तसेच कर्नाटकातील अलमट्टी धरणात 1 लाख 16 हजार 168 क्यूसेकने पाण्याची आवक होत आहे.

कोयना धरणाचे वक्रदरवाजे 4 फूट 6 इंच उघडून त्यातून 32 हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कोयना, कृष्णा नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चांदोलीत पाणीसाठा 31.62 टीएमसी झाला असून येथून 1593 विसर्ग वारणा नदीत सुरूच आहे.

शुक्रवारी सायंकाळी सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी 18 फूट 3 इंच होती. शनिवारी सायंकाळी पाणी पातळी 16 फूट 9 इंच झाली होती.

कोयना धरणातून शनिवारी दुपारपासून विसर्ग वाढविण्यात आला आहे. कोयना धरणाचे पाणी सांगलीत पोहोचण्यासाठी किमान 24 तास लागतात. त्यामुळे सांगलीत दुपारपासून पाणी पातळी वाढेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र, अलमट्टीतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने पाणी पातळी जास्त वाढणार नाही, असेही सांगण्यात आले.

कृष्णा नदीची शनिवारी सायकांळी विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची पातळी व कंसात इशारा पातळी फुटांमध्ये अशी ः कृष्णा पूल कराड 13.6 (45), आयर्विन पूल सांगली 16.9 (40) व अंकली पूल हरिपूर 20.4 (45.11).

अलमट्टी धरण 99 टक्के भरले

बेळगाव : पाण्याची आवक वाढल्यामुळे अलमट्टी धरण आता 98.85 टक्के भरले आहे. पाण्याचा विसर्ग एक लाख क्युसेकच ठेवण्यात आला आहे. अलमट्टी धरणाची क्षमता 123.01 असून, सध्या या धरणात 121.606 टीएमसी पाणी आहे. हे धरण आता 98.85 टक्के भरले आहे. या धरणात पाण्याची आवक 1 लाख 16हजार 168 क्युसेक होत आहे. पंधरा दिवसांपूर्वी हे धरण 92 टक्क्यापर्यंत भरले होते. मात्र, कृष्णा नदीला पूर आल्यामुळे तब्बल सव्वा दोन लाखापर्यंत विसर्ग वाढवण्यात आला होता. त्यामुळे पाण्याची टक्केवारी 85 पर्यंत खाली गेली होती.गेल्या तीन दिवसांपासून पाण्याचा विसर्ग कमी केलाने आता धरण 99 टक्के भरले आहे.

Back to top button